MarathiMati.com - Android App on Google Play Store

कुश लव रामायण गाती

प्रकाशन: संपादक मंडळ | २७ जून २००९

गीतकार: ग. दि. माडगूळकर
संगीतकार: सुधीर फडके
गायक: सुधीर फडके
गीत प्रकार: गीतरामायण
राग प्रकार: भूप

स्वये श्रीरामप्रभु ऐकती
कुश लव रामायण गाती ॥धृ॥

कुमार दोघे एक वयाचे
सजीव पुतळे रघुरायाचे
पुत्र सांगती चरित पित्याचे
ज्योतिनें तेजाची आरती ॥१॥

राजस मुद्रा, वेष मुनींचे
गंधर्वच ते तपोवनींचे
वाल्मीकींच्या भाव मनींचे
मानवी रुपें आकारती ॥२॥

ते प्रतिभेच्या आम्रवनांतिल
वसंत-वैभव गाते कोकिल
बालस्वराने करुनी किलबिल
गायनें ऋतुराजा भारिती ॥३॥

फुलांपरी ते ओठ उमलती
सुगंधसे स्वर भुवनीं झुलती
कर्णभूषणें कुंडल डुलती
संगती वीणा झंकारिती ॥४॥

सात स्वरांच्या स्वर्गामधुनी
नऊ रसांच्या नऊ स्वर्धुनी
यज्ञ-मंडपीं आल्या उतरुनी
संगमी श्रोतेजन नाहती ॥५॥

पुरुषार्थाची चारी चौकट
त्यात पाहतां निजजीवनपट
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट
प्रभुचे लोचन पाणावती ॥६॥

सामवेदसे बाळ बोलती
सर्गामागुन सर्ग चालती
सचिव, मुनिजन, स्‍त्रिया डोलती
आंसवें गाली ओघळती ॥७॥

सोडुनि आसन उठले राघव
उठुन कवळिती अपुले शैशव
पुत्रभेटिचा घडे महोत्सव
परि तो उभयां नच माहिती ॥८॥

MarathiMati.com - Android App on Google Play Store