गणराज रंगी नाचतो

लेखन शांता शेळके | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: शांता शेळके
संगीतकार: पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक: लता मंगेशकर
गीत प्रकार: बालगीत

गणराज रंगी नाचतो, नाचतो
पायि घागर्‍या करिती रुणझुण
नाद स्वर्गी पोचतो ! ॥धृ॥

कटि पीतांबर कसून भर्जरी
बाल गजानन नर्तनास करी
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो ! ॥१॥

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणावादन
ब्रम्हा धरितो तालही रंगुन
मृदंग धिमि वाजतो ! ॥२॥

देवसभा घनदाट बैसली
नृत्यगायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो ! ॥३॥