MarathiMati.com - Android App on Google Play Store

एका तळ्यात होती

लेखन ग. दि. माडगूळकर | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: ग. दि. माडगूळकर
संगीतकार: श्रीनिवास खळे
गायक: आशा भोसले
गीत प्रकार: राग - भीमपलास

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे पिल्लू तयांत एक ॥धृ॥

कोणी न त्यास घेई खेळावयास संगे
सर्वांहुनि निराळे ते वेगळे तरंगे
दावूनि बोट त्याला म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक ॥१॥

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशीं
भावंडा ना विचारी, सांगेल ते कुणाशी
जे ते तयास टोची दावी उगाच धाक
होते कुरुप वेडे पिल्लू तयात एक ॥२॥

एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाहतांना चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक ॥३॥

MarathiMati.com - Android App on Google Play Store