पर्यावरणपूरक गणेशोत्सव | Eco-friendly Ganeshotsav

भातुकलीच्या खेळामधली

प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार: मंगेश पाडगावकर
संगीतकार: यशवंत देव
गायक: अरुण दाते
गीत प्रकार: भावगीत
राग प्रकार: वृंदावनी सारंग

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी ॥धृ॥

राजा वदला, “मला समजली, शब्दांवाचुन भाषा
माझ्या नशिबासवे बोलती तुझ्या हातच्या रेषा”
का राणीच्या डोळां तेव्हा दाटुनि आले पाणी ? ॥१॥

राणी वदली बघत एकटक दूरदूरचा तारा
“उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दुज्या गावचा वारा”
पण राजाला उशिरा कळली गूढ अटळ ही वाणी ॥२॥

तिला विचारी राजा, “का हे जीव असे जोडावे ?
का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?”
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी ॥३॥

का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना ?
का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना ?
वार्‍यावरती विरून गेली एक उदास विराणी ॥४॥

Book Home in Konkan