MarathiMati.com - Android App on Google Play Store

आज गोकुळात रंग

लेखन सुरेश भट | प्रकाशन: संपादक मंडळ | २३ ऑक्टोबर २००८

गीतकार : सुरेश भट
संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक : लता मंगेशकर
गीत प्रकार : -

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी ! ॥धृ॥

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढुनी खुशाल रंग टाकतो
रंगवून रंगुनी गुलाल फासतो
सांगते अजूनही तुला परोपरी ! ॥१॥

सांग श्यामसुंदरास काय जाहले ?
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले !
एकटीच वाचशील काय तू तरी ! ॥२॥

त्या तिथे अनंगरंगरास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदंग मंजिर्‍यांत वाजला
हाय ! वाजली फिरून तीच बासरी ! ॥३॥

MarathiMati.com - Android App on Google Play Store