कल्पना एक आविष्कार अनेक एकांकिका स्पर्धा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ ऑक्टोबर २०१३

कल्पना एक आविष्कार अनेक एकांकिका स्पर्धा | Astitva Competition 2013

कै. श्री. "मु.ब.यंदे पुरस्कार"

अस्तित्व आयोजित कल्पना एक आविष्कार अनेक २०१३(वर्ष २७ वे) मराठी एकांकिका स्पर्धा.
कल्पना सूचक: प्रसिद्ध लेखक आणि नाटककार श्री. चं. प्र. देशपांडे.
कल्पना : हे किरकोळ, ते महत्त्वाचे !

सप्रेम नमस्कार.
मी सुचवलेल्या विषयाबाबत काही प्रस्तावना.
हे किरकोळ, ते महत्त्वाचे!

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : शनिवार १२ ऑक्टोबर २०१३

या उद्गारात दोन गोष्टी आहेत – हे कुणी कुणाला सांगणे आहे की स्वतःशी बोलणे आहे आणि दुसरे म्हणजे, महत्त्वाचे काय, हे पारंपरिक पद्धतीने ठरते आहे की वेगळ्या पद्धतीने. या सर्व प्रकारांत संघर्ष अटळ आहेत. यात मुख्य प्रश्न मूल्यनिश्चितीचा आहे. जवळचे आहे म्हणून किरकोळ आणि लांबचे, काहीसे अप्राप्य आहे म्हणून महत्त्वाचे, असे असते का? कुणी कुणाचे का ऐकावे, हाही प्रश्न यात येऊ शकतो. अशी वाक्ये अनेकदा कानांवर पडतात-"कलाबिला किरकोळ रे, व्यवहार बघणं महत्त्वाचं" "व्यवहार गेला तेल लावत, मी कलेसाठी जगणार आहे", "देशाचं सोड, आधी आपलं बघणं महत्त्वाचं", "आधी लगीन कोंढाण्याचं- योग्य वयात लग्न व्हायला हवे, गाडी-घर हे बघू पुढचं पुढे" "लग्नाच्या आधी गाडी-घर तयार हवे, नाही तर ते मिळवण्यातच निम्मे आयुष्य संपते", "मूल होणे किरकोळ, करीअर महत्त्वाची" "नीतीबीती या किरकोळ गोष्टी आहेत, एकच आयुष्य मिळते, ते मजेत जगणे महत्त्वाचे!" वगैरे. माझे, माझ्यासाठी ते सगळे महत्त्वाचे, बाकी सगळे किरकोळ, हेही एक तत्त्वज्ञान असू शकते. पण मग देशासाठी त्याग, ध्येयासाठी न्योछावर होणे, हे किरकोळ की महत्त्वाचे? आत्मघातकी हल्ले करणारे कोणते मूल्य मानतात? घडलेल्या घटनेपेक्षा कधीकधी तिच्या बाबतची मतमतांतरेच अधिक महत्त्वाची ठरतात आणि त्यांवरूनच हाणामाऱ्या होतात! हे सगळे नुसते मानसिक गोंधळ असतात का? मूल्यनिश्चितीची खिल्ली उडवण्यासाठी एखाद्या नाटकात एक साधी काडेपेटी, ती जणू खूप वजनदार वस्तू असल्याप्रमाणे अनेकजण उचलून आणतात आणि एखादी अवजड वस्तू सहज रिकाम्या पिशवीप्रमाणे आणली जाते ! अशा प्रकारचे असंख्य प्रश्न जगताना पडतात, अनेक समस्या या मूल्य ठरवण्याच्याच असतात. या सगळ्यांना आपण कशा प्रतिक्रिया देतो, हे कसे समजून घेतो वा समजून घेऊ इच्छित नाही – याचे काय परिणाम होतात, होऊ शकतात – या सगळ्याचा “आजचा वेध” घेण्यासाठी हा विषय दिलेला आहे. यात अनुभव, कल्पना, गांभीर्य, विनोद या सगळ्याला वाव आहे ! सर्वांना शुभेच्छा
- चं. प्र. देशपांडे.

अस्तित्व आयोजित कल्पना एक आविष्कार अनेक २०१३(वर्ष २७ वे) मराठी एकांकिका स्पर्धा.

  • प्राथमिक फेरी : रविवार १३ ऑक्टोबर २०१३
  • अंतिम फेरी : शनिवार १९ ऑक्टोबर २०१३
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख : शनिवार १२ ऑक्टोबर २०१३
  • प्रवेश अर्ज astitva.co.in या संकेतस्थळावर १० सप्टेंबर २०१३ पासून उपलब्ध होतील.