रितेश देशमुख म्हणतोय - थँक गॉड बाप्पा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ सप्टेंबर २०१६

रितेश देशमुख म्हणतोय - थँक गॉड बाप्पा | Thank God Bappa with Riteish Deshmukh and Star Pravah

मुंबई फिल्म कंपनी आणि स्टार प्रवाह निर्मित म्युझिक व्हिडिओ
रॅप ढंगाच्या गाण्यातून गणेशोत्सवाचे बदलेले रूप

गेल्या काही काळात गणेशोत्सवाचं रूप बदललं आहे. याच बदललेल्या गणेशोत्सवाच्या रुपावर ‘थँक गॉड बाप्पा’ या अनोख्या म्युझिक व्हिडिओतून भाष्य करण्यात आलं आहे.

रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुखनं मुंबई फिल्म कंपनीच्या माध्यमातून स्टार प्रवाहच्या सहकार्यानं या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. ‘थँक गॉड बाप्पा आमच्यासारखा नसतो’ असे शब्द असलेला हा म्युझिक व्हिडिओ अभिनेता रितेश देशमुखवर चित्रीत करण्यात आला असून, विशेष म्हणजे रितेशनंच हे गाणं गायलं आहे. ३१ऑगस्ट रोजी हे गाणं सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले.

जाहिरात क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या कपिल सावंत यांनी हे गाणं लिहिलं आहे. तसंच म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शनही केलं आहे. जाहिरात क्षेत्रातील प्रसिद्ध संगीतकार अमर मंगरूळकर यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे. मनोज लोबो यांनी छायाचित्रण, अदेले परेरिया यांनी संकलन, मंदार नागावकर यांनी कला दिग्दर्शन, पुनीत जैन व अम्रिता सरकार यांनी वेशभूषा, नितीन इंदुलकर यांनी रंगभूषा केली आहे.

‘थँक गॉड बाप्पा’ हे गाणं गणेशोत्सवातल्या इतर गाण्यांपेक्षा फारच वेगळं आहे. एक निराळा विचार हे गाणे मांडते. गीतकार आणि दिग्दर्शक कपिल सावंत यांच्या कवितेचे गाणे ते म्युझिक व्हिडियो या प्रवासात रितेश देशमुख यांचा सहभाग हा टर्निंग पॉईंट होता.  रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची मुंबई फिल्म कंपनी आणि स्टार प्रवाह यांनी मिळून हा म्युझिक व्हिडिओ प्रत्यक्षात आणला.

मनोरंजन वाहिनी म्हणून काम करताना ‘स्टार प्रवाह’ने कायमच सामाजिक भान जपलं आहे. मालिका आणि मनोरंजनाचे कार्यक्रम करताना समाजाला दिशा देणं हे 'स्टार प्रवाह' आपलं कर्तव्य मानते. त्याच विचारातून हे गाणं करण्यात आलं आहे. आता स्टार प्रवाह वाहिनी,हॉटस्टार तसेच सोशल मीडिया आणि इतर माध्यमांतून हे गाणं रसिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.