सतीश राजवाडेंची टाइम - बरा वाईट चित्रपटात हटके भूमिका

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ एप्रिल २०१५

सतीश राजवाडेंची टाइम - बरा वाईट चित्रपटात हटके भूमिका | Satish Rajwade's New Deadly Avatar in Time Bara Vait

आपल्या हटके आणि आशयघन चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक सतीश राडवाडे ‘टाइम - बरा वाईट’ या आगामी चित्रपटात दिसणार आहेत एका अनोख्या भूमिकेत. या चित्रपटात ते एका लोकल डॉन, राजा भाईची भूमिका साकारत आहेत. त्यांचा हा हटके अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्याचा सुखद धक्का देईल एवढं नक्की. आपल्या आशयघन चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या सतीश राजवाडेंच्या या भूमिकेची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

‘टाइम - बरा वाईट’ चे दिग्दर्शक राहुल भटनाकर यांच्या सांगण्यावरुन सतीश राजवाडेंनी आपल्या लूक वर बरीच मेहनत घेतली आहे. राहुल म्हणतात, “भाई राजा च्या भूमिकेसाठी मी एका सराईत गुन्हेगाराची कल्पना केली होती. मात्र त्याच बरोबर त्याच्या हालचालींमधून आणि संवादांमार्फत ती व्यक्तिरेखा विनोदी ही वाटायला हवी होती. मला ९० च्या दशकातील टिपीकल मुंबईय्या भाई चा लूक या व्यक्तिरेखेसाठी अभिप्रेत होता आणि या भूमिकेला सतीश राजवाडे योग्य न्याय देतील याची मला खात्री होती. आणि अपेक्षे प्रमाणेच त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यांची ही व्यक्तिरेखा चित्रपटाचा USP ठरु शकते.”

‘वीआरजी मोशन पिक्चर’ ची निर्मिती असलेला ‘टाइम - बरा वाईट’ हा विनोदाची झालर असलेला थरारपट आहे. सिनेमाचे खिळवून ठेवणारे कथानक, आणि निराळ्या बाजाचं पार्श्वसंगीत यामुळे हा सिनेमा नक्कीच वेगळा ठरतो. ५ जूनला प्रदर्शित होणारा हा चित्रपट सतीश राजवाडेंनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे त्यांच्या फॅन्स साठी नक्कीच एक सरप्राईज ठरणार आहे.