रेगे चित्रपटाचा मामि महोत्सवात वर्ल्ड प्रीमिअर

लेखन संपादक मंडळ | प्रकाशक संपादक मंडळ | २२ ऑक्टोबर २०१३

रेगे चित्रपटाचा मामि महोत्सवात वर्ल्ड प्रीमिअर | Rege Mami World Premiere

‘रेगे’ २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता मेट्रो सिनेमागृहात, तर २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१५ वाजता वर्सोवा येथील सिनेमॅक्स येथे दाखवण्यात येणार आहे.

अलीकडेच अख्ख्या पोलिस दलाला हादरवून सोडणाऱ्या एका वादग्रस्त ‘एन्काऊन्टर’ प्रकरणाचा संदर्भ असलेल्या ‘रेगे’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर उद्या, २२ ऑक्टोबर रोजी ‘मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ (मामि) होत आहे. अभिजित पानसे लिखित-दिग्दर्शित ‘रेगे’ची निवड ‘मामि’च्या ‘न्यू फेसेस इन इंडियन सिनेमा’ या प्रतिष्ठेच्या विभागात झाली आहे.

‘रेगे’ २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता मेट्रो सिनेमागृहात, तर २३ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१५ वाजता वर्सोवा येथील सिनेमॅक्स येथे दाखवण्यात येणार आहे. महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री, आरोह वेलणकर, संतोष जुवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘रेगे’चं छायालेखन आघाडीचे छायाचित्रकार महेश लिमये यांनी केले आहे. हिंदीतील प्रख्यात संगीतकार माँटी शर्मा (ब्लॅक, सावरिया) यांचं पार्श्वसंगीत ‘रेगे’ला लाभलं आहे.

खऱ्या घटनेवर आधारित वास्तववादी चित्रपट बनवताना त्यात अधिकाधिक खरेपणा यावा यासाठी व्यक्तिरेखांची नावेही खरीच वापरण्यात आली आहेत. म्हणूनच एन्काऊन्टर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (महेश मांजरेकर), सचिन वाझे (पुष्कर श्रोत्री), नामचीन गुंड डी. के. (विजू माने) ही वास्तव आयुष्यातील माणसे त्यांच्या नावानिशी ‘रेगे’मध्ये भेटतात. चित्रपटात अनेक खऱ्या संदर्भांचा वापर केलं असला तरी चित्रपटाची कथा मात्र काल्पनिक असल्याचे अभिजीत पानसे यांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, वादग्रस्त विषय आणि खऱ्या नावांचा वापर असूनही सेन्सॉर बोर्डाने कुठलीही आडकाठी न घेता ‘रेगे’ला ‘यू ए’ प्रमाणपत्र दिलं आहे. यासंदर्भात पानसे म्हणाले, “पहिलाच चित्रपट ‘मामि’सारख्या प्रतिष्ठेच्या महोत्सवासाठी निवडला गेल्यामुळे हुरूप आला आहे. सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळवताना त्रास होईल, असे वाटले होते, पण तिथेही विनासायास प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आता ‘मामि’च्या व्यासपीठावरून प्रथमच प्रेक्षकांसमोर कलाकृती सादर करण्यासाठी मी उत्सुक आहे.”