मंगलाष्टक वन्स मोअर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० नोव्हेंबर २०१३

मंगलाष्टक वन्स मोअर

रेणू देसाई निर्मित ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याची सर्वात लोकप्रिय जोडी स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज होत असून ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुण्यातील गुजराती कुटुंबात जन्माला येऊन तेलुगु चित्रपटांत आघाडीची अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या रेणू देसाई आपल्या ‘श्रीआद्या फिल्म्स’ या बॅनरद्वारे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या बहुचर्चित चित्रपटाचे छायालेखन रुपेरी पडद्यावर अलीकडेच उत्पन्नाचे सर्व विक्रम मोडणाऱ्या ‘दुनियादारी’ या सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव करणार आहेत. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या लाडक्या जोडीबरोबरच रुपेरी पडद्यावर धमाल उडवून देण्यासाठी सई ताम्हणकर, कादंबरी कदम आणि हेमंत ढोमे हे कसलेले कलाकार सज्ज झाले आहेत.

मंगलाष्टक वन्स मोअर’ या सिनेमाविषयी बोलताना संजय जाधव म्हणाले, “या सिनेमाची संकल्पना अतिशय उत्कृष्ट आहे. या सिनेमाच्या निर्मात्या रेणू देसाई या एक प्रगल्भ कलाकार आहेत. त्यांची चित्रपटाविषयी असलेली निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. आपल्या कामाच्या प्रति अशी निष्ठा असलेल्या लोकांसोबत काम करणे हा खुप चांगला अनुभव असतो.

दुनियादारी’ सारखा यशस्वी चित्रपट देणारे व मूळचा कॅमेरामनचा पिंड असलेल्या संजय जाधव यांनी ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटाच्या छायांकनासाठी होकार दिल्यामुळे निर्मात्या रेणू देसाई या देखील खुश आहेत. याबाबत आपला आनंद व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “संजय जाधव यांच्या कामाची मी ‘डोंबिवली फास्ट’ या चित्रपटापासून चाहती आहे. सर्वोत्कृष्ट छायालेखकांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटासाठी त्यांच्यासोबत काम करणे हा सुखद अनुभव असेल.”

मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन समीर हेमंत जोशी यांनी केले असून प्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीर यांनी या चित्रपटाची गाणी स्वरबद्ध केली आहेत. गीते गुरू ठाकूर यांनी लिहिलेली असून अवधूत गुप्ते, बेला शेंडे, वैशाली सामंत, अभिजीत सावंत, मंगेश बोरगावकर, किर्ती किल्लेदार या आघाडीच्या गायकांनी या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे.

ट्रेलर - प्रोमो