फँड्री - ज्वलंत प्रेमकथेचा चित्रपट

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १४ फेब्रुवारी २०१४

फँड्री - ज्वलंत प्रेमकथेचा चित्रपट | Fandry - Marathi movie review

हा संघर्ष आहे जगण्याचा, हक्काचा, अधिकाराचा आणि माणुसकीचा ! संब्याला शालू आणि काळी चिमणी भेटली कि नाही हा विषय बाजूला राहून नागराज मंजुळे यांच्या प्रामाणिक कथानकाचा विजय होतो, शेवटी हेच खरे…!

'फँड्री' हे कथानक जातिव्यवस्था, दारिद्रय आणि त्यात अडखळलेली व्याकुळ प्रेमकथेची वास्तविकता आहे. नुसतीच भावनिकता, भडक दृश्ये आणि कृत्रिम संवाद कुठेच नसून अस्सल बोलीभाषेतून थेट विषयालाच हात घातला आहे. इतर चित्रपटासारखे आंबट (पानचट) कथानक नसल्याने तो सामान्य बुद्धीला सहज समजणारच नाही. याचा विषयच असामान्य असल्याने थिल्लर टाळक्याच्या सामान्य डोक्यांनी एकांतात हा चित्रपट पहावा . नुसत्या टाळ्या आणि शिट्या वाजवण्यापलीकडे समाजाचे दाहक कथानक समजण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नुसत्या प्रेमकथा आपण भरपूर पाहिल्या पण विज्ञानवादी युगात झेप घेणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यात अश्याच ज्वलंत प्रेमकथेची राखरांगोळी होणारी दांभिकता या कथानकात दिसते.

बहुजनांच्या पोरांनी वरच्या जातीतील पोरीसोबत प्रेम, लग्न करायचंच नसतं, "बामनीन चिमणीला हात लावायचा नसतो, तिच्या सोबतच्या चिमण्या तिला आपल्या कळपात घेत नाहीत, तिला वाळीत टाकतात !" या संवादावरून कट्टर धर्मांधता स्पष्ट होते. खरं तर याच विचारसरणीला लाथ घालण्याचा प्रयत्न नागराज मंजुळे यांनी केला आहे.

'फँड्री' हा शब्द नसून तमाम जातीव्यवस्थेला लागलेली घाणेरडी शिवी आहे !

काळ्या चिमणीच्या पाठी लागलेला जंब्या शालूच्या प्रेमात व्याकूळ होऊन तिचाच पाठलाग करत असल्याची सांगड चांगलीच घातली आहे. पण प्रत्येक वेळेस तो पाटील, त्याचा मुलगा आणि सनातन गावकरी त्याच्या स्वप्नाचा चुराडा करतात. सध्यस्थितीत अशा कित्येक शालूला अजून त्याची जाणीव नसल्याची खुण दिसून येते. खालच्या जातीतल्या माणसांची स्वप्नं, ध्येय, जीवन, अधिकार काहीच नसतात त्यांनी फक्त वरच्या जातीतल्या लोकांची सेवा करायची असते (कसलीच अपेक्षा न बाळगता) हीच मानसिकता पोखरून कथानकामधून लाचार जगण्याला लाथ मारली आहे. बाप आपल्या मुलीच्या लग्नाला पैसे जमा करण्यासाठी डुक्कर पकडण्यासारखी घाणेरडी लाचार कामे करत असतो. गरिबांच्या घरी सण, उत्सव, लग्नसोहळा काही नसतो ! त्या दिवशी वरच्या जातीच्या लोकांची सेवा करायची असते या वास्तविकतेची थरारक मांडणी केली आहे. आपल्या मुलीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी सगळ्या घराबाळाला सोबत घेवून डुक्कर पकडण्यासाठी पाठवले जाते. डुक्कर पकडत असतानाचे विदारक आणि करुण चित्रीकरण केले आहे. डुकराच्या पाठीमागे व्याकूळ होऊन धावताना गावातील गुंड जातीयवादी लोकांकडून झालेली छळवणूक, संब्या आणि त्याच्या घरच्यांची होणारी टिंगल टवाळी या सगळ्या गोष्टी अमानुषतेची प्रतिमात्मकता दाखवतात. आगाव गावकरी त्या डुकराला आणि संब्याला 'फँड्री' या नावाने हाक मारतात आणि तेंव्हाच 'फँड्री' या शब्दाचा किती विकृत अर्थ आहे हे समजतं. 'फँड्री' हा शब्द नसून तमाम जातीव्यवस्थेला लागलेली घाणेरडी शिवी आहे ! शेवटी त्या डुकराला पकडून लाकडाला बांधून नेत असताना पाठीमागे भिंतीवर महापुरुषांच्या प्रतिमा दाखवून त्यांच्या विचारांची आजही गरज असल्याचे अप्रतिम दृश्य दाखवले आहे. या दृश्याने नागराज मंजुळे यांचा दृष्टीकोन विषयाला थेट हात घालतो.

कथानक साधे असून उच्च विचारसरणीच्या पातळीवर मांडणी केली आहे. हा चित्रपट सामान्य बुद्धीच्या बाहेरचा असल्याने तो परत परत बघूनच समजेल. समाजातील धर्मांधता, चालीरीती आणि वास्तविक द्वेष या सगळ्या प्रथेविरुद्ध हा बंड आहे. जुलमी आणि प्रस्थापीत व्यवस्थेच्या थोबाडात प्रतिमात्मकरित्या दगड मारून चित्रपटाचा शेवट होतो. चित्रपट संपतो पण संघर्ष संपत नाही. हा संघर्ष आहे जगण्याचा, हक्काचा, अधिकाराचा आणि माणुसकीचा ! संब्याला शालू आणि काळी चिमणी भेटली कि नाही हा विषय बाजूला राहून नागराज मंजुळे यांच्या प्रामाणिक कथानकाचा विजय होतो, शेवटी हेच खरे…!

ट्रेलर - प्रोमो