अंकुश चौधरी - महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१५

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ८ डिसेंबर २०१५

अंकुश चौधरी - महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१५ | Ankush Chaudhari - Maharashtracha Favourite Kon 2015

महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता आणि स्टाईल आयकॉन अंकुश चौधरी साठी २०१५ हे वर्ष विलक्षण ठरले आहे. महाराष्ट्राची लोकधारा आणि एकांकिकांमधून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अंकुशने २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लासमेट्स, डबल सीट आणि दगडी चाळ या सुपर हिट चित्रपटातील आपल्या उत्कृष्ट अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. हे तीनही चित्रपट अंकुशच्या अभिनयी कारकिर्दीला यशाच्या शिखरावर नेणारे ठरले.

क्लासमेट्स मधील सत्या, डबल सीट मधील अमित आणि दगडी चाळ मधील सूर्या या तीनही व्यक्तिरेखा प्रेक्षकांवर छाप पाडणाऱ्या आहेत आणि म्हणूनच प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या अंकुशला या वर्षीच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१५’ मध्ये महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता आणि स्टाईल आयकॉन या दोन पुरस्कारांचा मानकरी ठरवले. प्रेक्षक व समीक्षकांनी केलेलं कौतुक आणि अभिनयातील कुशलपणा यामुळे अंकुशने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले एक घट्ट स्थान निर्माण केलेलं आहे. लागोपाठ ३ सुपर हिट चित्रपट, दगडी चाळने बॉक्स ऑफिस वरती केलेली धूम आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं प्रेम यामुळे अंकुश साठी २०१५ वर्ष खूप खास ठरले.

सध्या अंकुश, संजय जाधव दिग्दर्शित ‘गुरु’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गुरुच्या टीझर वरून या चित्रपटात अंकुश अलग स्टाईल मध्ये आणि अॅक्शनपॅक पर्फोरमन्स देताना दिसून येणार आहे. दुनियादारी नंतर परत एकदा अंकुश चौधरी आणि संजय जाधव ही अभिनेता - दिग्दर्शकाची जोडी ‘गुरु’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. २०१३ मधील दुनियादारीमुळे या जोडीला मिळालेल्या यशानंतर आता २०१६ मध्ये प्रदर्शित होणार्‍या ‘गुरु’ मधील त्यांची गुरुगिरी प्रेक्षकांचा उत्साह वाढवणारी असेल. २०१६ मध्ये देखील अंकुशच्या यशाची घोडदौड सुरूच राहील यात शंकाच नाही.