इफ्फी महोत्सवात क्षितीजला युनेस्कोचे गांधी पदक

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ डिसेंबर २०१७

इफ्फी महोत्सवात क्षितीजला युनेस्कोचे गांधी पदक | UNESCO Gandhi Medal for Kshitij in IFFI

मराठी सिनेमा कात टाकतो आहे. नवीन आशय आणि संकल्पनेच्या जोरावर आतापर्यंत कित्येक मराठी सिनेमांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी घोडदौड केली आहे. या घोडदौडीत भारतातील सामाजिक आणि वास्तववादी विषयावर आधारित असलेल्या मराठी सिनेमांचादेखील समावेश होतो. मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू. एस) आणि नवरोज प्रसला प्रॉडक्शनचे नवरोज प्रसला निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर सहनिर्मित ‘क्षितिज - A HORIZON’ या सिनेमानेदेखील अशीच एक भरारी घेतली आहे. गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) निवडण्यात आलेल्या अंतिम ९ चित्रपटांमध्ये ‘क्षितीज’ला सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी युनेस्को गांधी पदकाने सन्मानित करण्यात आले. शिवाय यु. एस. ए. येथे झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिवल हॉस्टनमध्ये देखील या सिनेमाने बेस्ट फिचर अवॉर्डवर आपली मोहोर उमटवली आहे. तसेच याआधी झालेल्या केपटाऊन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ‘क्षितीज’ सिनेमाची दखल घेत, दिग्दर्शक मनोज कदम यांना ‘बेस्ट न्यू फिल्म डिरेक्टर’च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर यू. एन. जिनीवा स्वित्झरलॅंड येथील ग्लोबल मायग्रेशन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या क्षितिजावरदेखील आपल्या मराठमोळ्या ‘क्षितीज’ला महत्व प्राप्त झाले आहे.

शिवाय हैदराबाद येथे होत असलेल्या विसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ह्या सिनेमाची निवड झाली असून, कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘क्षितीज’ला नामांकन लाभले आहे. तसेच मुंबईत होत असलेल्या थर्ड आय आशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील हा सिनेमा दाखवला जाणार असल्यामुळे शिक्षणाचा संदेश देणार्‍या या सिनेमाचे महत्व आणखीनच वाढले आहे. प्रोफेसर रेबन देवांगे लिखित या सिनेमाचे नीरज वोरलीया यांनी संकलन केले आहे. योगेश राजगुरू यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे ध्वनीमुद्रण ऑस्करविजेते रसूल पुकुट्टी यांचे तर शैलेंद्र बर्वे यांचे पार्श्वगायन या सिनेमाला लाभले आहे.