दिग्गज कलाकारांचा घोळात घोळ

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १८ ऑक्टोबर २०१३

घोळात घोळ

बबन प्रभूंचा तुफान गाजलेला ‘घोळात घोळ’ हा फार्स तब्बल ३६ वर्षांनी रंगभूमीवर परततोय.

फार्स म्हटलं कि बबन प्रभूंचं नाव चटकन डोळ्यांसमोर येतं. अभिरुचीच्या दृष्टीने सवंग मानल्या गेलेल्या या प्रकाराला बबन प्रभूंनी प्रतिष्ठा मिळवून दिली. प्रभूंच्या या फार्सिकल नाटकांचं गारुड केवळ प्रेक्षकांवरच नव्हे तर रंगकर्मींवरही आजही कायम असल्यामुळे ही नाटकं रंगकर्मींना सतत खुणावत असतात. म्हणूनच आता प्रभूंचा तुफान गाजलेला ‘घोळात घोळ’ हा फार्स तब्बल ३६ वर्षांनी रंगभूमीवर परततोय.

या नव्या ‘घोळात घोळ’च्या निमित्त अनेक मजेशीर ‘घोळ’ जुळून आले आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांचं नाव अभिरुचीपूर्ण, अभिजातपणाकडे झुकणाऱ्या नाटकांशी जोडलं गेलंय. असा दिग्दर्शक आज इतक्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर ‘घोळात घोळ’च्या निमित्ताने फार्ससारख्या नाट्यप्रकाराकडे वळलाय. केवळ एवढ्या एका गोष्टीवरून बबन प्रभूंच्या लेखनातील ताकद लक्षात यावी. विशेष म्हणजे विजय केंकरे यांचं हे एक्कावन्नावं नाटक आहे.

दुसरा महत्त्वाचा घोळ म्हणजे नेहमी गंभीर, इंटेन्स भूमिकांसाठी परिचित असलेले रमेश भाटकर या फार्समध्ये तद्दन विनोदी भूमिकेत दिसणार आहेत. भाटकरांना एकतर चरित्र भूमिकांत किंवा खलनायकी भूमिकांमध्ये पाहण्याची प्रेक्षकांना सवय आहे. मात्र, एरवी गंभीर वाटणारा, दिसणारा माणूस उत्तम कॉमेडी करू शकतो, याचे दाखले आपल्याकडे खूप आहेत. त्यामुळेच भाटकरांची निवड अचूक ठरेल, असा निर्मात्याला विश्वास आहेस. स्वतः भाटकर याविषयी म्हणतात की, पडद्यावर माझी इमेज गंभीर असली तरी वास्तव आयुष्यात मी गमतीदार स्वभावाचा माणूस आहे. शिवाय, माझ्या कारकीर्दीची सुरुवातही ‘काका किश्याचा’सारख्या विनोदी नाटकाने झाली होती. त्यानंतर फारशा विनोदी भूमिका मला करायला मिळाल्या नाहीत. पण, विनोदी भूमिकाही मी उत्तम करू शकतो.”

रमेश भाटकर यांच्याखेरीज संजय नार्वेकर, हेमंत ढोमे, विजय पटवर्धन, रसिका आगाशे, रुई पवार, नेहा कुलकर्णी यांच्या यात प्रमुख भूमिका असून राजन भिसे यांचं नेपथ्य आहे. निर्माते संतोष शिदम यांच्या ‘मल्हार’ या निर्मिती संस्थेने हा ‘घोळ’ घालण्याची जबाबदारी उचलली आहे. शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातून या घोळाला सुरुवात झाली आहे.