Download MarathiMati.com's New Android App from Google Play

कोल्हा आणि कोंबडा

लेखन: अनंत दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ जुलै २००६

कोल्हा आणि कोंबडा | Kolha Aani Kombda

मुला, पहा मी कसा संकटात सापडलो आहे; आणि हे सगळे केवळ तुझ्यामुळे झाले.

एका शेतकऱ्याने कोल्हयास पकडण्यासाठी एक सापळा लावून ठेवला होता, त्यात सकाळीच एक भला मोठा कोल्हा सापडला. ती मौज दुरून एका कोंबडयाने पाहिली, परंतु कोल्ह्यासारख्या लबाड व दुष्ट शत्रूवर एकाएकी विश्वास ठेवणे बरे नव्हे, म्हणून तो हळूहळू भीत भीत सापळ्यापाशी आला आणि कोल्ह्याकडे पहात उभा राहिला.

कोल्ह्याने त्यास पाहिले, तेव्हा तो मोठा संभावितपणाचा आव आणून त्यास म्हणतो, ‘मुला, पहा मी कसा संकटात सापडलो आहे; आणि हे सगळे केवळ तुझ्यामुळे झाले; मी सकाळीच पलीकडल्या कुंपणांतून घराकडे जात असता, तुझा शब्द माझ्या कानी पडला, तेव्हा तुझी कशी काय हालहवाल आहे, ते विचारून मग जावे, अशा विचाराने मी इकडे आलो, तो या चापात अडकलो.

आता कृपा करून तू जर मला एक बारीक काठी आणून देशील, तर ती या सापळ्यात घालून, मी आपली सुटका करून घेईन. हे तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही.’ हे ऐकून कोंबडा घरी गेला आणि सापळ्यात कोल्हा अडकला आहे, असे त्याने आपल्या धन्यास सांगितले. तो शेतकरी एक मोठा सोटा घेऊन आला आणि त्याने त्या त्या कोल्ह्याची पाठ अशी मऊ केली की, त्या माराने तो कोल्हा ताबडतोब मरण पावला.

Download MarathiMati.com's New Android App from Google Play