दोघे मुलगे आणि दुकानदार

लेखन: अनंत दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | ९ जुलै २००६

दोघे मुलगे आणि दुकानदार | Doghe Mulge aani Dukandaar

‘देवाची शपथ घेऊन सांगतो की, तुमचा लाडू मजपाशी नाही.’

दोन तरुण मुलगे एका फराळाच्या दुकानात गेले आणि दुकानदाराचे लक्ष दुसरीकडे आहे असे पाहून, त्यापैकी एकाने एक लाडू चोरला आणि तो दुसऱ्याकडे दिला. त्याने तो आपल्या खिशात लपविला. लाडवांच्या ताटातला वरचा लाडू गेलेला पाहून, दुकानदारास या दोघांचा संशय येऊन तो म्हणाला, ‘तुमच्याशिवाय माझा लाडू कोणी चोरला नाही.’ हे ऐकताच, ज्याने लाडू चोरला होता, तो म्हणतो, ‘देवाची शपथ घेऊन सांगतो की, तुमचा लाडू मजपाशी नाही.’ ज्याच्या खिशात लाडू होता तो म्हणतो, ‘मीही शपथ घेऊन सांगतो की, मी काही तुमचा लाडू चोरला नाही.’ दुकानदार म्हणाला, ‘तुम्हा दोघापैकी कोणी लाडू चोरला, हे मला सांगता येत नाही, पण तुम्हांपैकी एक असामी चोर असून, तुम्ही दोघेही लबाड आहात, हे मी अगदी खात्रीने सांगतो.’

तात्पर्य - लबाडीने खरे भाषण करण्यात मोठेसे भूषण नाही, कृत्यातही खरेपणा पाहिजे.