दैव आणि गांवढळ मनुष्य

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१८
दैव आणि गांवढळ मनुष्य - इसापनीती कथा | Daiv Aani Gavandal Manushya - Isapniti Katha | Isapniti Story
दैव आणि गांवढळ मनुष्य

दैव आणि गांवढळ मनुष्य - इसापनीती कथा - [Daiv Aani Gavandal Manushya - Isapniti Katha/Isapniti Story]

एका मनुष्यापाशी बराच पैसा होता, पण तेवढयाने त्याचे समाधान होईना. कित्येक व्यापारी लोकांनी अगदी थोडया वेळात हजारो रूपये मिळविलेले पाहून, आपणही व्यापारावर पैसा मिळवावा, असे त्यास वाटले. मग त्याने काही भांडवलावर व्यापार केला व त्यात त्यास सुदैवाने पुष्कळ पैसा मिळाला. ‘इतक्या अल्प अवकाशात तुम्ही एवढे श्रीमंत कशाने झाला?’ असा काही लोकांनी त्यास प्रश्न केला, तेव्हां तो म्हणतो, ‘हे सगळे चातुर्याचे आणि उदयोगाचे फळ आहे’. मिळालेल्या पैशांत समाधान मानून तो मनुष्य जर स्वस्थ बसला असता, तर त्यास आपले सगळे आयुष्य मोठया सुखाने घालविता आले असते, परंतु दुर्दैवाने आणखी द्रव्य मिळविण्याची इच्छा त्यास उत्पन्न झाली. शेवटी व्यापार करता करता सगळेच पारडे फिरले आणि एके दिवशी तर दुपारच्या जेवणाचीही त्यास भ्रांत पडली! ही त्याची दुःस्थिती ऐकून काही लोक त्याच्या समाचारास आले. त्यांनी त्यास विचारले, ‘अहो, ही इतकी वाईट स्थिती तुम्हांस आली तरी कशी?’ तो म्हणाला, ‘हे सगळे माझ्या दैवाचे खेळ आहेत, माझ्या दैवाने माझी अशी स्थिती केली.’ दैव जवळच होते, त्याने हे शब्द ऐकताच त्यास म्हटले, ‘अरे बाबा, तुला जेव्हा पैसा मिळाला होता, तेव्हा जर तुला माझी आठवण झाली नाही, तर आता तुझ्या हया दुःस्थितीचे खापर तू माझ्या कपाळावर का फोडतोस ?’