बोकड आणि खाटीक

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१८
बोकड आणि खाटीक - इसापनीती कथा | Bokad Aani Khatik - Isapniti Katha | Isapniti Story
बोकड आणि खाटीक

बोकड आणि खाटीक - इसापनीती कथा - [Bokad Aani Khatik - Isapniti Katha/Isapniti Story]

प्राचीन काळी एकदा, एक गावातल्या सगळ्या बोकडांनी सभा भरवून खाटकांच्या हाती न सापडण्याची तजवीज कशी करावी, यासंबंधीने विचार चालविला. आपल्या मालकाचा डोळा चुकवून सर्वांनी पळून जावे, ही युक्ती सर्वानुमते पसंत ठरली व त्याच दिवशी अमलात आणावी असे ठरले. ते ऐकून त्यातला एक म्हातारा शहाणा बोकड त्यास म्हणतो, ‘अरे, तुम्ही हे लक्षात ठेवा की, आपण जरी पळून गेलो, तरी बोकडाच्या मांसाशिवाय लोक राहतील, ही गोष्ट शक्य नाही. शिवाय खाटीक लोक आपल्या कामात चांगले वाकबगार असल्यामुळे आमचा जीव घेताना ते आम्हांस फार वेळ धडपडत ठेवीत नाहीत, परंतु आपण एकदा येथून निघून रानावनातून हिंडू लागलो म्हणजे भलत्याच अडाणी लोकांच्या हाती सापडू आणि ते आमचे हालहाल करून आम्हांस मारतील.’ हे ऐकताच बोकडांनी आपला ठराव रद्द केला आणि ते आपापल्या घरी चालते झाले.

तात्पर्य: कोठेही जाऊन दुःख टाळता येणे शक्य नसेल तर निदान जेथे कमी दुःख होईल ती जागा पत्करावी, हा शहाणपणा होय.