बोका आणि कोल्हा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१८
बोका आणि कोल्हा  - इसापनीती कथा | Boka Aani Kolha - Isapniti Katha | Isapniti Story
बोका आणि कोल्हा

बोका आणि कोल्हा - इसापनीती कथा - [Boka Aani Kolha - Isapniti Katha/Isapniti Story]

एका अरण्यातील एक झाडाखाली एक बोका व एक कोल्हा राज्यकारस्थानासंबंधाने बोलत बसले होते. कोल्हा म्हणाला, ‘बोकोबा, कदाचित येथे आपणावर जर एखादे संकट आले, तर हजार युक्ती योजून मी त्यातून निभावून जाईन, पण तुझे कसे होईल, याबद्दल मला मोठी काळजी वाटते.’ बोका म्हणाला, ‘गडया, मला फक्त एकच युक्ती ठाऊक आहे, तेवढी चुकली तर मात्र माझी धडगत नाही.’ कोल्हा म्हणाला, ‘तर बाबा, तुझी चिंता मला फार वाटते, अरे बापडया, तुला एक - दोन युक्ती मी तरी शिकवल्या असत्या; पण आजचा काळ असा हे की ज्याने त्याने आपल्या स्वतःपुरते पहावे, दुसऱ्याच्या उठाठेवी करू नयेत. बरे तर आता रामराम ! आम्ही येतो.’ इतके बोलून कोल्हा निघाला, तो मागून हा हा म्हणता पारध्याचे कुत्रे धावत आले. बोक्यास झाडावर चढता येत होते, त्यामुळे त्याने आपला जीव वाचविला. पण कोल्ह्याच्या हजार युक्त्यांपैकी एकही युक्ती त्याच्या उपयोगी पडली नाही. तो घाबरून चार पाच पावले धावत होता आणि तेवढ्यात कुत्र्यांनी त्याला धरले.

तात्पर्य: दुसऱ्यापेक्षा मी अधिक शहाणा, अशी बढाई मारण्याला त्याचे शहाणपण वेळेवर उपयोगी पडत नाही; पण ज्याला तो कमी शहणा समजतो त्याचेच शहाणपण शेवटी उपयोगी पडते. असा प्रकार बहुधा वारंवार घडतो, एखादयाला एकच विदया चांगली येत असेल, तर तिच्यापासून जे काम होईल ते अनेक अपुऱ्या विदयांपासून होणार नाही.