अस्वल आणि कोंबडी

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१८
अस्वल आणि कोंबडी - इसापनीती कथा | Aswal Aani Kombadi - Isapniti Katha | Isapniti Story
अस्वल आणि कोंबडी

अस्वल आणि कोंबडी - इसापनीती कथा - [Aswal Aani Kombadi - Isapniti Katha/Isapniti Story]

पर्वतावर राहणाऱ्या एका अस्वलास अशी इच्छा उत्पन्न झाली की, जगात प्रवास करून निरनिराळे प्रदेश, प्राणी व त्यांच्या रीतिभति यांचे अवलोकन करावे. मग ते अस्वल प्रवासात निघाले व त्याने पुष्कळ अरण्ये व अनेक देश पाहिले. एके दिवशी वाट चुकून ते एका शेजारच्या कुंपणात शिरले असता तेथे त्याने एका डबक्याजवळ पुष्कळ कोंबडी पाणी पीत असलेली पाहिली. ती कोंबडी पाण्याचा एक घोट घेतल्यावर आकाशाकडे ते आपली तोंडे करीत असत व पुनः खाली तोंड करून दुसरा घोटा घेत असत. हा प्रकार पाहून अस्वलास इतके आश्चर्य वाटले की, त्यासंबंधाचा खुलासा त्या कोंबडयास विचारल्याशिवाय त्याच्याने राहवेना. मग त्याने एका कोंबडयास त्यासंबंधाने प्रश्न विचारला. तेव्हा कोंबडा त्यास म्हणाला, “पाणी पिताना आम्ही वरचेवर आकाशाकडे तोंडे करतो ती, देवाने जी सुखे आम्हांस दिली आहेत त्याबद्दल त्याचे आभार मानण्यासाठी करतो. ही धार्मिक चाल आमच्यात फार दिवसांपासून चालत आली असून ती जर आम्ही मोडली तर आम्हांस मोठे पातक लागेल. ” हे ऐकताच अस्वल मोठमोठयाने हसू लागले व त्यांस वेडावून त्याने त्यांच्या धर्मभोळेपणाची अगदी टर उडवली. तेव्हा तो कोंबडा रागावून मोठया धीटपणाने त्यास म्हणतो, “गृहस्था, तू या ठिकाणी अगदी नवखा आहेस ह्यामुळे तुझे हे असभ्यपणाचे वर्तन कादाचित्‌ क्षम्य आहे असे म्हणता येईल; तथापि एक गोष्ट तुला सांगितल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. ती ही की, जे लोक धार्मिक कृत्यांवर विश्वास ठेवतात, त्या लोकांच्या देखत त्या धार्मिक कृत्याची टवाळी करण्यास अस्वलाशिवाय दुसरा कोणताही प्राणी तयार होणार नाही. ”

तात्पर्य: दुसऱ्याच्या धर्मविधींची टवाळकी करणे हा मूर्खपणा होय.