गणपतीच्या पूजेतील मंदार व शमीचे महत्त्व

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १ जानेवारी २०१८
गणपतीच्या पूजेतील मंदार व शमीचे महत्त्व - गणपतीच्या गोष्टी | Ganapatichya Pujetil Mandar Va Shamiche Mahatva - Ganpati Stories
CAPTION

गणपतीच्या पूजेतील मंदार व शमीचे महत्त्व - गणपतीच्या गोष्टी - [Ganapatichya Pujetil Mandar Va Shamiche Mahatva - Ganpati Stories] प्राचीन काळातील ही कथा आहे. औरव नावाचा एक ब्राह्मण ऋषी होत. त्याला शमीका नावाची एक सुस्वरुप व गुणवान मुलगी होती.

ती उपवर झाल्यावर औरव ऋषींनी तिचा विवाह योग्य ऋषीचा पुत्र व शौनकशिष्य मंदार याच्याशी करून दिला. स्वतंत्र आश्रम बांधून मंदार - शमीका यांचा संसार आनंदात सुरू होता.

एकदा त्यांच्या आश्रमात भृशुंडीऋषी आले. मोठे पोट, स्थूल देह आणि सोंड असे त्याचे रुप पाहून त्यांचा पाहुणचार करताना मंदार - शमीका या उभयतांना सतत हसू येत होते. आपले रुप पाहून या तरुण दांपत्यास सतत हसू फुटत आहे हे पाहून भृशुंडीऋषी संतापले. ‘तुम्ही मला विनाकारण हसत आहात. तेव्हा तुम्हाला वृक्षयोनी प्राप्त होईल.’ असा शाप देऊन ते तडक तेथून निघून गेले. त्यांच्या शापामुळे मंदार व शमीका यांना वृक्षयोनी प्राप्त झाली.

इकडे मंदारचे गुरू शौनक आणि सासरे औरव यांना बरेच दिवस मंदार - शमीकासंबंधी काहीच वार्ता न समजल्याने ते चिंतातूर झाले आणि या दोघांच्या शोधार्थ निघाले. खूप शोध करुनही जेव्हा मंदार - शमीका यांचा ठावठिकाणा त्यांना समजेना तेव्हा शौनकऋषींनी आपल्या ज्ञानदृष्टीने भृशुंडीच्या शापाची गोष्ट जाणली. मंदार - शमीका यांना या शापापासून मुक्ती मिळावी म्हणून गजाननाला प्रसन्न करून घेण्यासाठी ते तपास बसले. त्यांनी गजाननाच्या षडाक्षर मंत्राचा (श्री गणेशाय नमः) जप करून बारा वर्षे तपश्चर्या केली. गजानन प्रसन्न झाले. शमीका - मंदार यांना पूर्ववत मनुष्यदेह प्राप्त व्हावे अशी शौनकऋषींनी त्यांच्याजवळ प्रार्थना केली.

भृशुंडी हे माझे परमभक्त असल्याने त्यांचा शाप वाया जाणार नाही परंतु मी त्या दोघांना उःशाप देतो असे सांगून गजानन म्हणाले, ‘भृशुंडीचा शाप खोटा होणार नाही. पण आजपासून मी मंदारवृक्षाच्या मुळांशी वास करीन आणि शमीपत्रे मला प्रिय होतील.’तेव्हापासून गणपतीपूजेत दुर्वांसोबत शमीपत्रे आणि मंदाराचे फूल वाहण्याची प्रथा सुरू झाली.

मुलांनो, या कथेतून गणपतीबाप्पा तुम्हाला असा संदेश देतात की कधीही कोणाचीही शारीरिक व्यंगावरुन मस्करी उडवू नये.