पुढ्यात पैसे नाही ठेवले

लेखन: अनंत दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | २ डिसेंबर २००७

पुढ्यात पैसे नाही ठेवले - चातुर्य कथा | Pudhyat Paise Nahi Thevale - Chaturya Katha

‘माझ्या दर्शनानं काहीतरी मिळाल्यासारखं तुम्हाला वाटतयं, तुमच्या भेटीनं मलाही काहीतरी नको का वाटायला ?’

एक गृहस्थ महात्मा गांधीकडे गेला व त्यांची भेट होताच त्यांना म्हणाला, ‘आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. आयुष्यात आपण काही तरी मिळवलं असं आता मला वाटू लागलयं.’

याप्रमाणे तो निघून जाऊ लागला असता म्हात्माजी त्याला म्हणाले, ‘माझ्या दर्शनानं काहीतरी मिळाल्यासारखं तुम्हाला वाटतयं, तुमच्या भेटीनं मलाही काहीतरी नको का वाटायला ?’

गांधीजींच्या या प्रश्नानं गोंधळून गेलेला तो गृहस्थ त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागला असता ते पुढं म्हणाले, ‘अहो, तुम्ही ‘दर्शन’ हा शब्द वापरुन मला अगदी देवपदी बसवलतं ना? मग देवाचं दर्शन घडताच त्याच्यापुढे जसे पैसे ठेवले जातात, तसेच तुम्हीही माझ्यापुढे थोडेफ़ार पैसे नको का ठेवायला ? तुम्ही तर नुसतचं दर्शन घेऊन चाललात ! तुम्ही माझ्यापुढे जर पैसे ठेवले असते, तर ‘हरिजन निधी’ साठी मलाही तुमच्याकडून काहीतरी मिळाल्यासारखं वाटलं असतं.

महात्माजींच्या या खुलाशानं आश्रमवासी मंडळीत हास्याची खसखस पिकली, पण त्याचबरोबर, कारण नसता उगाच महात्माजींचा वेळ घ्यायला आलेल्या त्या गृहस्थानं तिथून जाण्यापूर्वी त्यांच्या हरिजण निधीला काही रक्कम देणगी म्हणून दिली.