ओवाळणी

लेखन: अनंत दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | २ डिसेंबर २००७

ओवाळणी - चातुर्य कथा | Ovalani - Chaturya Katha

‘दादा, तुमच्याकडे तहानं मूल आहे; तेव्हा गाय सध्या तुझ्याकडेच राहू दे. आम्हाला मूल झालं की गाय मी घेईन.’

एका गृहस्थाला दोन मुले होते, एकाचं लग्न झालं होतं तर दुसऱ्याच व्हायचं होत. मृत्यूसमय जवळ येताच आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, ‘ तुमच्यासाठी मी बरीच शेतीवाडी ठेवली आहे; मोठा वाडाही आहे, शिवाय तुम्हा दोघांनाही चांगल्या नोकऱ्या आहेत, तेव्हा एकीनं व प्रेमानं वागा. तुम्हाला कशाचीही कमतरता पडणार नाही. परंतू जर का तुम्ही केवळ आपापला स्वार्थच बघत राहिलात, तर मात्र खाऊन पिऊन केवळ दिवस ढकलणाऱ्या जनावरांच्या जिवणाची आवकळा तुमच्या जिवनाला येईल.’ याप्रमाणे उपदेश केला आणी थोड्याच दिवसात त्या गृहस्थाने या जगाचा निरोप घेतला.

तो गृहस्थ वारला आणि वर्षभरात त्याच्या धाकट्या मुलाचं लग्न झालं. त्याची बायको अतिशय स्वार्थी होती. तिनं आपल्या नवऱ्यामागे वेगळी होण्याची भुणभुणं लावली. अख्रेर तो मोठ्या भावाकडे गेला व त्याला म्हणाला, ‘दादा, हिची इच्छा आहे तेव्हा आपण वेगळं होऊया.’ मोठ्या भावानं धाकट्या भावाच्या म्हणण्याला नाइलाजानं मान्यता दिली; एकाच घरात दोघांची दोन बिऱ्हाडं झाली; आणि वडिलोपार्जीत मालमत्तेची दोघां भावांमध्ये सारखी वाटणी झाली.

राहता राहिली परसदारी राहीलेली एक दुभती गाय. धाकटा भाऊ म्हणाला, ‘दादा, तुमच्याकडे तहानं मूल आहे; तेव्हा गाय सध्या तुझ्याकडेच राहू दे. आम्हाला मूल झालं की गाय मी घेईन.’ पण सध्या तरी का होईना , गाईच दूध मोठ्या दिराला जाऊ देण धाकट्या भावाच्या स्वामीनीला मंजूर होईना. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, ‘काय हो, आम्हाला जेव्हा मूल होईल, तेव्हा ती गाय आम्ही घेऊ असं जे तुम्ही तुमच्या दादाला म्हणालात ते गाईच्या पायावरची आयुष्यरेषा पाहून व तोवर जाणार आहे याची खात्री करुन घेऊन का ? ते काही नाही; गाईचीसुध्दा वाटणी झालीच पाहिजे.’

‘म्हणजे सकाळचं दूध दादानं घ्यायचं आणि संध्याकाळचं आपणं घ्यायचं, असं करायचं का ?’ धाकट्या भावानं मोठ्या आदबीन आपल्या स्वामीनीला प्रश्न केला. यावर ती स्वार्थी बाई म्हणाली, ‘समजा, सकाळी त्या गाईनं भरपूर दुध दिलं, आणि संध्याकाळी तुम्ही दुध काढायला गेल्यावर तिनं पान्हा चोरला, तर काय तुम्ही त्या गाईविरुध्द न्यायालयात नुकसानभरपाईचा दावा दाखल करुन तिच्याकडून ते दूध वसूल करुण घेणार आहात ? नाही ना ? त्यापेक्षा मी सांगते तसं करा. गाईला आहे तशीच जिवंत ठेवून, दादा तुमच्या पुढचे म्हणून त्यांना गाईचा पुढला निम्मा भाग द्या, आणि तुम्ही दादांच्या मागचे म्हणून तिच्या मागला निम्मा भाग घ्या. म्हणजे काय होईल ? चारापाणी दादा करतील; तिच्या मानेला दावं बांधण व सोडणं हेही तेच करतील; आणि आपल्या वाट्याला अगदी फ़ुकट तिचं दुध व शेण येईल. आहे की नाही माझं डोकं ? हे काय ? माझ्या कल्पकतेबद्दल माझं कौतूक करायचं सोडून, चेहरा असा आंबट का करता ? मर्दासारखे दादाकडे जा आणि गाईच्या वाटणीबाबतच्या माझ्या मसुद्याला मान्यता मिळवून या. जा की दादांकडे ? त्यांना घाबरायला ते काही झुरळ किंवा पाल तर लागून राहिले नाहीत ना ?’

प्रत्येक बाबतीत बायकोपुढं तहाची बोलणी करणाऱ्या धाकटया भावाने, मोठ्या भावापुढं लाजतबुजत गाईच्या वाटणीचा बायकोकृत मसुदा मांडला. आपल्या अप्पलपोटी वहिनीनं केलेल्या वाटणीमागील लबाडी कळूनसुध्दा, मोठ्या भावाने मोठ्या मनाने त्या वाटणीला मान्यता दिली.त्यानंतर दररोज गाईला चारापाणी घालणे, तिला रानात चरायला पाठविण्यासाठी तिचे दावे सोडणे व संध्याकाळी ती घरी परतल्यावर तिला बांधणे , ही जबाबदारी मोठा भाऊ पार पाडू लागला, तर तिचं ‘मागच्या बाजूचं उत्पन्न’ म्हणून तिचं दूध व शेण धाकटा भाऊ घेऊ लागला.

हे असं चालू असतानाच दिवाळी आली आणि भाऊबिजेच्या आदल्या दिवशी मोठ्या भावाचा मेहुणा बायकोचा भाऊ खास भाऊबिजेसाठी दूरच्या गावाहून आपल्या बहिणीकडे आला.बहिणीकडून गाईच्या वाटणीची ती अजब हकिकत ऎकून, तो पंधरा सोळा वर्षाचा, पण कनखर शरिरयष्ठीचा व तल्लख बुध्दीचा भाऊ तिला म्हणाला, ‘ताई, उद्या तुला ओवाळणीत मी काय घालणार आहे, हे ठाऊक आहे का तुला ? मी तुला ओवाळणीत घालणार आहे अख्खी गाय ?’ भाऊ काय बोलला हे बहिणीला कळलचं नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी तो पाहुना तोडांत दंतमंजनाच बोट घालून, दात घासत मागल्या दारी बांधलेल्या गाईच्या आसपास फ़ेऱ्या मारू लागला. त्याच वेळी त्याच्या बहिणीने तो धाकटा दीर त्या गाईपाशी सहकुटुंब आला. गाईच्या आंचळापाशी बसून व ढोपरात एक पितळेची मोठी कासंडी घरुन, त्याने गाईचं दूध काढायला सुरुवात केली.

त्यानं दुधाच्या आठ दहा धारा कासंडीत ओढल्या असतील नसतील, तोच पाहुण्यानं त्या गाईच्या मुस्काटात मारली. त्याबरोबर त्या गाईनं झटकलेल्या जोरदार तडक्यासरशी तो धाकटा भाऊ आपल्या बायकोच्या अंगावर फ़ेकला गेला आणि त्याने व त्याच्या बायकोने एकाच वेळी त्या गोमातेला जोडीनं उलटा साष्टांग नमस्कार घातला.

त्या अनपेक्षीत आपघातानं भडकून गेलेली ती बाई शेणामातीच्या व वेलबुट्टीनं सुशोभीत झालेल्या साडीसह खमठोकपणे उभी राहिली व त्या पाहुण्यावर कडाडली, ‘बेअकल्या ! तुला देवानं डोकं दिलयं की नाही ?’

तिची ती मुलुखमर्दाने आवाजातली रणगर्जना कानी पडताच, कुणाच्याही भांडणात अवीट गोडी घेणारे शेजारीपाजारी ताबडतोब त्यांच्या अवतीभवती प्रकट झाले. अनायासे लाभलेल्या या श्रोतृवृंदाना उद्देशून पाहुणा म्हणाला, ‘रसिक बंधूभगिनिंनो ! देवानं मला डोकं पुरेपुर दिलेलं आहे. दिलं नाही या बाईला आणि हिच्या मांडलिक नवऱ्याला. वास्तविक या गाईचा पुढला अर्धा भाग माझ्या मेहुण्यांचा व माझ्या बहिणीचा आहे. तेव्हा गाईच्या पुढल्या भागात असलेल्या तिच्या गालावर जर मी चपराक दिली असली, तर या बाईला वा हिच्या नवऱ्याला बोलण्याचा काय अधिकार ? त्यातून या गाईनं लाथेचा जो प्रसाद या दांपत्याला दिला, ती लाथही तिनं मागल्या पायानं मारली. मग मागचं सर्व उत्पन्न यांच असल्याचं यांनीच ठरविलेलं असताना, गाईच्या मागल्या पायाच्या लाथा यांनी नाही खायच्या, मग काय माझ्या मेहुण्यांनी अ बहिणीनं खायच्या ?

आपलं बोलण श्रोतृवृंद तन्मयतेनं व चवीनं ऎकत असल्याच पाहून पाहुणा पुढं म्हणाला, ‘काल मी माझ्या बहिणीकडे आलो, तेव्हा कळलं की, या क्षुद्र वृत्तीच्या जोडाप्यानं या गाईचा पुढला भाग माझ्या थोर मनाच्या मेहुण्याला दिला असून, स्वत:ला मागला निम्मा भाग घेतला आहे. साहजिकच गेले तीन चार महिने माझ्या मेहुण्यांनी या गाईला चारापाणी घालावा, आणि गाईचं दूध, शेण व मुत्र याचा आस्वाद या फ़ुकटखाऊंनी घ्यावा, असं चाललं आहे. म्हणून काल संध्याकाळी मी मुद्दाम गुरांच्या डॉक्टरांकडे गेलो व त्यांना म्हणालो, ‘डॉक्टर गाय ही जे घ्यायचं ते सर्व पुढल्या बाजूनं घेते द्यायचं ते सर्व मागल्या बाजूनं देते, तेव्हा दूध तरी निदान तिनं पुढल्या बाजूनं द्याव, यासाठी काही इलाज आहे का ? यावर गुरांचे डॉक्टर मला म्हणाले, ‘तिचं दूध काढायला सुरुवात झाली रे झाली, की तिच्या तोंडात एक चपराक देत जा. महिना पंधरा दिवस असं केलंत, की ती गाय आचळातून दूध देण्याऎवजी तोंडावाटे दूध देऊ लागेल.’ गुरांच्या डॉक्टरांनी असं सांगितलं, म्हणूनच मी या निरपराध गाईच्या श्रीमुखात दिली, आणि आणखी महिनाभर इथे मुक्काम ठोकून, हिचे दूध काढले जाऊ लागले की सकाळ संध्याकाळ हिला अशीच चपराक देत राहणार आहे.’

पाहुण्यांच्या या मिस्कील व उपरोधपूर्ण बोलण्यामुळं अवतीभवती जमलेल्या अबालवृध्द श्रोत्यांना हास्याचा नुसता पूर आला आणि गाईच्या मागच्या निम्म्या भागाचा स्वामी लाजेनं चूर झाला.मग तो धाकटा भाऊ स्वत:ची कंबर दाबत उठला व पाहुण्यापुढं साष्टांग नमस्कार घालून म्हणाला, ‘पाहुणे, तुमचं वय लहान, पण योग्यता महान आहे. ही गाय घ्या आणि ती पूर्णपणे माझ्या दादाला द्या.’

पाहुणा म्हणाला, ‘ही गाय मी तुमच्या दादांना देणार नाही.’ ‘मग काय ती तुम्ही घेऊन जाणार ?’ धाकट्या भावानं विचारलं.पाहुणा म्हणाला,’छे छे ! आज भाऊबीज; तेव्हा ही गाय मी माझ्या बहिणीला ओवाळणी म्हणून घालणार आहे.’पाहुण्यांच्या या बोलण्यावरही शेजारीपाजारी खदखदून हसले, पण त्याचबरोबर तडाखेबंद विनोदी नाटकाचा बहारदार प्रयोग लवकर संपला, म्हणून हळहळत घरी निघून गेले.