मेले कोण - नेले कुणाला

लेखन: अनंत दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | २ डिसेंबर २००७

मेले कोण - नेले कुणाला - चातुर्य कथा | Mele Kon Nele Kunala - Chaturya Katha

इंग्रज राज्यकर्त्यांविरुध्द महात्मा गांधीनी सुरु केलेली सन १९४२ ची ‘छोडे भारत’ चळवळ ऎन जोमात होती.

इंग्रज राज्यकर्त्यांविरुध्द महात्मा गांधीनी सुरु केलेली सन १९४२ ची ‘छोडे भारत’ चळवळ ऎन जोमात होती. क्रांतीवीर नाना पाटील यांनी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात ‘पत्री सरकार’ म्हणजे ‘प्रति सरकार’- स्थापन करुन, इंग्रजांच्या तोंडाचं पाणी पळविलं होतं. नाना पाटलांना जिवंत पकडता न आल्यास; त्यांना गोळी घालून ठार करण्याचा गोऱ्या सरकारचा हुकूम सुटला होता. अशा कठीण परिस्थितीत नानांची वृध्द आई मॄत पावली.

नाना मातृभक्त; तेव्हा आईच्या अंत्यदर्शनाला ते नक्की येणार, याबद्दल इंग्रज सरकारला शंका नव्हती. सरकारच्या अपेक्षेप्रमाणे ते घरी आलेही. त्यांनी घरात प्रवेश करताच, टेहेळणीवर असलेल्या गोऱ्या सरकारच्या शिपायांनी त्यांच्या घराच्या अंगणाआवाराभोवती पक्का गराडा घातला.

थोड्या वेळानं हाराफ़ुलांनी आच्छादून गेलेलं प्रेत लोकांने घरातून उचलून आणून, ते ओसरीवर तयार करुन ठेवलेल्या ताटीवर ठेवलं व लगेच ताटी उचलण्यात आली. त्याच वेळी घराच्या मागल्या बाजुनं एक मनुष्य एक बैलगाडी हाकीत पुढल्या अंगणात आला. त्य बैलगाडीत नानांच्या आईसाठी स्मशानात चिता रचण्याकरिता लागणारी जाडजाड लाकडं खच्चून भरली होती. पुढे ताटी, मागे लाकडांनी भरलेली बैलगाडी, आणि तिच्या मागोमाग नानांच्या नात्यागोत्यातील गंभीर चेहऱ्याने चालणारी मंडळी, अशी ती अंत्ययात्रा ‘श्रीराम जयराम जय जय राम’ च्या नामघोषात पुढल्या अंगणाच्या फ़ाटकातून बाहेर पडली.

परकीय सरकारच्या शिपायांनी त्या अंत्ययात्रेतील अगदी गाडीवानासह प्रत्येकाला न्याहाळून निरखून फ़ाटकाबाहेर सोडले, परंतू त्यांना त्यामध्ये नाना पाटील आढळले नाहीत ! साहजिकच त्यांनी असा निष्कर्ष काढला की, ‘ज्या अर्थी नाना पाटलांना घरात शिरताना काही शिपायांनी पाहिले, पण अंत्ययात्रेत सामील झालेल्या माणसात ते आढळले नाहीत, त्या अर्थी ते घरातच कुठेतरी लपून बसलेले असणार, ‘म्हणून ते घराते घुसले. परंतू घराचा कानाकोपरा धुंडाळूनही त्यांना ते सापडले नाहीत. मग त्या शिपायांनी आपला मोर्चा स्मशानाभुमीकडे वळविला.

प्रेतयात्रा आता स्मशानभूमीच्या जवळ पोहोचली होती. बंदूकधारी शिपाई स्मशानभुमीच्या दिशेनं येत असल्याचं पाहून लुगडे वगैरे स्त्रीवेष घेऊन मृत आईच्या रुपात ताटीवर निपचित पडून राहिलेल्या नाना पाटलांनी अंगाभोवतीच्या दोऱ्या पटापट तोडून व घातलेली हारफ़ुले झटकून पटकन ताटीवरुन खाली भुईवर उडी मारली आणि ते क्षणार्धात तिथून पसार झाले. मग आप्तसंबंधीयांनी बैलगाडीतील लाकडात लपवून ठेवलेलं नानांच्या आईचं प्रेतं बाहेर काढून त्यांच दहन केलं.

क्रांतीवीर नानांच्या मृत आईच्या चिता चार दोन तासात पूर्णपणे जळून विझून गेली, पण ब्रिटीश सरकार आणि त्यांचे शिपाई मात्र नानांनी त्यांना बेमालूम बनविल्यामुळे त्यांच्यावर शेवटपर्यंत जळत राहिले !