NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store
MarathiMati.com - Android App on Google Play Store

तर मी तुझा मुलगा उठवीन

Chaturya Katha 9 - Tar Mi Tujha Mulaga Uthavin

लोकांच्या उध्दारासाठी गावोगाव फिरत फिरत भगवान बुध्ददेव एका गावी गेले . त्या गावी त्यांचा मुक्काम असतानाच, त्या गावातील एका बाईचं मुलं मेलं. मुलाचं शव घेऊन ती बाई भगवान बुध्दांकडे गेली व ते शव त्यांच्यापुढं ठेवुन त्यांना म्हणाली, 'भगवन ! आपला मुक्काम आमच्या गावात असताना माझं मूल मरतं, याचा अर्थ काय ? आपण त्याला जिवंत केलं पाहीजे.'

चार समजुतींच्या गोष्टी सांगूनही बाई ताळ्यावर येत नाहीसे पाहुन बुध्ददेव तिला मुद्दाम म्हणाले, 'माई, तु या गावात फिर, आणि ज्या घरात आजवर कुणीच माणूस मेलेलं नाही, अशा घरातून मूठभर गहू मागून ते मला आणून दे. मी ते गहू मंत्रवून तुझ्या मुलाच्या अंगावर टाकीन आणि त्याला जिवंत करीन.' बुध्ददेवांचे हे आश्वासन ऎकून ती बाई मोठ्या आशेनं त्या गावातल्या घरोघरी गेली, आणि तिनं प्रतेक ठिकाणी चौकशी केली, पण तिला अंस एकही घर आढ्ळून आलं नाही, की जिथे आजवर कुणीच मेलेलं नाही !

एका घरी चौकशी केली असता त्या घरातील बाई म्हणाली, 'दोनच महिन्यापूर्वी काळानं माझ्या धन्याला भरल्या घरातून ओढुन नेलं! दुसर्‍या घरातला पुरुष डोळे पुशीत म्हणाला, चारच महिन्यांपूर्वी माझी गुणी बायको, पाच कच्च्याबच्च्यांना माझ्या हवाली करुन परलोकी गेली !' कुठे कुणाच्या घरात कुणाचा चुलता, कुणाची चुलती, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, बाप वा आई, केव्हा ना केव्हा गेलेलेच होते.

या प्रकारानं निराश झालेली ती बाई परत बुध्ददेवांकडे गेली व त्यांना म्हणाली, 'भगवन ! गावातल्या घराघरात गेले, पण ज्या घरी कधीच कुणी मेले नाही, असे घरच मला आढळून आले नाही. त्यामुळे आपण सांगितलेल्या तऱ्हेचे गहू मी आणू शकले नाही.' बुध्ददेव म्हणाले, 'माई ! अग प्रत्येक प्राणीमात्राच्या नशीबी जर आज ना उद्या मरण अटळ आहे, तर तुझ्या बाळाला उद्याऎवजी आज मृत्यू आला, म्हणून असं दु:ख करीत बसणं योग्य आहे का ? तेव्हा त्या मृत मुलाचा मोह सोडून, तू दु:ख आवर आणि मनुष्य म्हणून आपल्यावर पडणारी कर्तव्ये पार पाडण्यात रमून जा.' भगवान बुध्ददेवांच्या या चातुर्यपूर्ण उपदेशानं ती दु:खी माता बरीच शांत झाली आणि आपल्या बाळाचं शव घेऊन तिथून निघून गेली.


MarathiMati.com - Android App on Google Play Store