NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

अक्काबाईची आराधना

Chaturya Katha - Akkabaichi Aaradhana

एका गृहस्थाची परिस्थिती अगदीच बेताची होती. त्याला एका अधिकारी सत्पुरुषाकडून लक्ष्मीला, त्याचप्रमाणे दारिद्रयाची देवता अवदसा हिला प्रसन्न करुन घेण्याचे, असे दोन प्रभावी मंत्र मिळाले.

तो गृहस्थ लक्ष्मीच्या मंदिरात गेला, पण तिला प्रसन्न करुन घेण्यासाठी तिची प्रार्थणा करायला आलेल्या लोकांची तिथे एवढी झुंबड उडाली होती की, बराच प्रयत्न करुनही त्याला त्या मंदिरात प्रवेश मिळेना.तितक्यात त्याचं लक्ष जवळच असलेल्या अवदसेच्या मंदिराकडे गेलं ते मंदीर पाहताच त्याच्या मनात एक वेगळीच कल्पना चमकली व त्याची पावले त्या मंदिराकडे वळली.

त्या मंदीरात शुकशुकाट होता. गाभार्‍यात असलेल्या मुर्तीपुढे त्याने अनुष्ठान सुरु केले व ते संपताच त्याने तिला प्रसन्न करुन घेण्य़ाचा प्रभावी मंत्र म्हटला. त्याबरोबर प्रकट होऊन तिनं त्याला विचारलं, 'ओळखलंस का तू मला? मी अवदसा उर्फ अक्काबाई आहे. माझी आराधना करुन, मला प्रसन्न करु पाहणारा तू पहिलाच माणूस आहेस. बोल, तुला काय हवंय ? आहे त्यापेक्षा अधिक दारिद्रय हवं ? की दुर्बुध्दी हवी ? की व्यसनाधीनता हवी ? यापैकी तू मागशील ते मी देइन.'

यावर तो गरीब चतूर माणूस हात जोडून तिला म्हणाला, हे अवदसे! तुझी किंचीतही दॄष्टी माझ्यावर किंवा माझ्या वंशजावर पडू नये, एवढेच माझे तुजकडे मागणे आहे.'अवदसा शब्दात अडकून गेली होती, तिला त्या गृहस्थाचं मागणं मान्य कराव लागलं. पण त्यामुळे त्या गॄहस्थाच्या घरातलं दारिद्रय जाऊन त्याची परिस्थिती भराभर सुधारु लागली.


Book Home in Konkan