NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

हजरजबाबी कालीदास

Chaturya Katha - Hajarjababi Kalidas

भोजराजाच्या पदरी असलेला कालीदास हा जसा अत्यंत प्रतिभासंपन्न कवी होता तसाच तो प्रतिस्पर्ध्याच्या प्रश्नाला पटकन चपलख उत्तर देऊन, त्याला निरुत्तर करण्यात पटाईत होता.

या कालीदासाचा एका कलावंतीणीवर अतिशय लोभ होता. तिचं नृत्य व गायन ऎकण्यासाठी तो बहुतेक दररोज तिच्याकडे जाई.एकदा सकाळी तो तिच्या घरावरुन जात असता तिन त्याला हाक मारली व त्याला बाजारातून चांगलासा मासा घेऊन येण्याची विनंती केली. तिला नाराज करणं जिवावर आल्यामुळं, त्यानं तिच्याकडून पिशवी घेतली आणि बाजाराची वाट धरली.

मासळीबाजारात मासे घेऊन बसलेल्या एका कोळ्याकडून एक ताजा मासा विकत घेऊन त्याने त्याच्याकडून त्या माशाचे सोयिस्कर खंड करुन घेतले. मग ते तुकडे त्या कोळ्याला पिशवीत घालायला सांगून, तो ती पिशवी हाती घेऊन कलावंतिणीच्या घराकडे जाऊ लागला.

कालीदासावर आतून जळणार्‍या एका माणसाने त्याच्या हातातली माशाच्या रक्तानं भरलेली ती पिशवी पाहून त्याला मुद्दाम विचारलं, ‘काय हो कवीराज ? थैलीत काय आहे?’

कालीदास : थैलीत रामायण आहे.

चौकस गृहस्थ : मग पिशवी ओली का दिसते?

कालीदास : रामायणासारख्या नवरसांनी ओथंबलेला ग्रंथ पिशवीत ठेवलेला असताना, ती त्या रसांमुळे भिजून गेल्याशिवाय कशी राहील?

चौकस गृहस्थ : पण मग रक्ताचे डाग का पडले आहेत त्या पिशवीला ?

कालीदास : राम-रावण युध्दात जे राक्षस मारले गेले, त्यांच्या रक्ताचे आहेत ते डाग.

चौकस गृहस्थ : तेही एक वेळ मान्य करायला हरकत नाही; पण घाण कसली सुटली आहे ?

कालीदास : राक्षसांच्या कुजलेल्या प्रेतांची.

कालीदासानं दिलेली उत्तर ऎकून अधिक प्रश्न विचारून, आपली आधिक शोभा करुन घेण्याऎवजी निघून गेलेलं बरं, असा विचार त्या खवचट गृहस्थानं केला आणि त्याने आपला रस्ता सुधारला.


Book Home in Konkan