NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

मोहिनी

Chaturya Katha - Mohini

एका धिप्पाड व शक्तीमान राक्षसानं आपल्याला सिध्दी प्राप्त व्हावी म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या सुरु केली.खडतर अशा तपश्चर्येनंतर शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले व म्हणाले, ' हे राक्षसा ! तू केलेल्या तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो आहे; तेव्हा तू कोणताही एक वर माग. मी तो तुला देइन.'यावर तो तामसी वृत्तीचा राक्षस म्हणाला, ' हे शंकरा ! मी ज्याच्या ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन, त्याचे त्याचे भस्म होऊन जाईल, अशी सिध्दी तू मला दे. मला दुसरे तिसरे काही नको.'या राक्षसाला आपण हा वर दिला, तर तो काय अनर्थ करुन सोडील, या गोष्टीचा विचार न करता शंकरांनी 'तथा‍ऽस्तु' म्हणून त्याला तो वर दिला व ते तिथून अंतर्धान पावले.

परंतु त्या वरामुळं तो राक्षस एवढा उन्मत्त बनला की, जो दिसेल व त्याला जो नको असेल, त्याच्या मस्तकावर हात ठेवून तो त्याचे भस्म करु लागला. जग त्याला 'भस्मासूर' या नावानं ओळखू लागलं व त्याचं नुसतं नाव निघालं तरी चळचळा कापू लागलं.

एकदा तर भस्मासूर प्रत्यक्ष वर देणाऱ्या शंकरांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांचं भस्म करण्य़ासाठी त्यांचा पाठलाग करु लागला, तेव्हा शंकर मदत मागण्यासाठी विष्णूंकडे गेले.सरळ द्वंद्वयुध्दात या भस्मासुरांपुढं आपला निभाव लागेलच अशी खात्री न वाटल्यानं भगवान विष्णूंनी अत्यंत सुंदर अशा मोहिनी अप्सरेचं रुप घेतलं आणि भस्मासूरासमोर सुंदर अंगविक्षेपांसह नृत्य करायला सुरुवात केली. मोहिनींच ते अलौकिक रुप पाहून बेभान झालेला भस्मासूर, ती नाचेल तसा नाचू लागला व ती हातवारे करी तसे हातवारे करु लागला.

आपल्यावर मोहित झालेला भस्मासूर आता पूर्णपणे देहभान हरपून गेला असल्याचे पाहून, मोहिनीचं रुप घेतलेल्या विष्णूंनी आपला हात आपल्या मस्तकावर ठेवला; त्याबरोबर भस्मासुरानेही मोहिनीचे अनुकरण केले. आणि आपला हात आपल्या मस्तकावर ठेवून, स्वत:च स्वत:चे भस्म करुन घेतले !


Book Home in Konkan