NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store
MarathiMati.com - Android App on Google Play Store

देवा, तुमचं कसं व्हायचं ?

Chaturya Katha - Deva, Tumache Kase Vhayache ?

एक लाकूडतोडया लाकूड तोडण्यासाठी नदीकाठच्या झाडावर चढला असता, त्याची लोखंडाची कुर्‍हाड खाली असलेल्या खोल डोहात पडली. त्याला पोहता येत नसल्याने, डोहात उडी मारुन कुर्‍हाड काढता येईना. साहजिकच तो नदीच्या काठी बसून रडू लागला.

त्याला रडताना पाहून देव तिथे प्रकट झाला व त्याने एकामागून एक सोन्याची-चांदीची-तांब्याची-पितळेची व शेवटी लोखंडाची अशा पाच कुर्‍हाडी त्या डोहातून काढून त्याला दाखविल्या. परंतू त्यापैकी 'लोखंडाची कुर्‍हाड हीच आपली' असे त्याने सांगितल्यामुळे देवाने त्याच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन, त्याला पाचही कुर्‍हाडी इनाम म्हणून दिल्या.

तिथून देवलोकी गेल्यावर देवाने ही गोष्ट आपल्या 'देवी' ला सांगितली. ती ऎकून देवी म्हणाली, 'सध्याच्या काळी एवढा प्रामाणिक माणूस मिळणं कठीण. मला तरी दाखवा तो माणूस.'देवीच्या आग्रहाखातर, देव तिला घेऊन भूलोकी लाकूडतोडयाच्या गावाबाहेर आला आणि लाकूडतोडयाच्या प्रामाणिकपणाची थोडीशी झलक देवीला दाखविण्यासाठी त्याने एक युक्ती योजली.

त्या लाकूडतोडयाची बायको गावाबाहेरच्या शेतावर गेली असता, देवाने मायेच्या योगाने तिला नाहीशी केली व देवीसह तो एका झुडपाआड दडून बसला.बराच वेळ झाला तरी शेतावर गेलेली बायको घरी परतली नाही म्हणून तो लाकूडतोडया शेतावर गेला व तिचा शोध घेऊ लागला. बराच वेळ शोध घेऊनही जेव्हा ती सापडेना, तेव्हा त्यानं ढसढसा रडत तिला हाका मारायला सुरुवात केली.

त्याला रडताना पाहून देव देवीला म्हणाला, 'देवी ! हाच बरं का तो प्रामाणिक लाकूडतोडया. आता मी तुला त्याच्या प्रामाणिकपणाचा नमुना दाखवतो.'याप्रमाणे बोलून देव देवीसह त्या लाकूडतोडयाजवळ गेला व त्याने त्याला विचारले, 'बा लाकूडतोडया ! तू का बरं रडतोस ?''माझी शेतावर आलेली बायको नाहीशी झाली म्हणून', लाकूडतोडयानं उत्तर दिलं. यावर देव म्हणाला, 'थांब रडू नकोस. मी तुला एकामागून एक पाच बायका दाखवतो त्यातील तुझी कोणती ते खरं सांग, म्हणजे मी तिला तुझ्या स्वाधीन करीन.'

याप्रमाणे बोलून देवानं तोंडानं कसलातरी मंत्र पुटपुटुन तिथे एक अप्सरेसारखी सुंदर व तरुण स्त्री निर्माण केली आणि तिच्याकडे बोट दाखवून त्यानं लाकूडतोड्याला विचारल, 'हिच का तुझी बायको ?'त्या स्त्रिचं रंगरुप पाहून मोहित झालेला तो लाकूडतोडया बेधडक म्हणाला, 'होय देवा ! हीच ती माझी हरवलेली माघारीण!'त्याची ती लबाडी पाहून देवीनं आपल्या पतीकडे अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं.

त्याबरोबर देव भडकून त्या लाकूडतोडयाला म्हणाला, 'मी तुला प्रामाणिक समजत होतो, पण तु लुच्चा आहेस. ही तुझी बायको आहे काय ?'यावर तो लाकूडतोडया स्वत:ची बाजू सावरण्यासाठी म्हणाला, 'देवा, तुमचा गैरसमज होतोयं. मागच्यावेळी पाच कुर्‍हाडी दाखवून, अखेर माझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून तुम्ही त्या पाचही कुर्‍हाडी मला बक्षीस दिल्यात. मग आताही पाच बाया दाखवून माझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून त्या पाचही जणींना तुम्ही मला बक्षीस दिल्यात, तर त्यांच मी पोषण कसं करु? म्हणून मी ही पहिलीच बाई माझी बायको असल्याचे तुम्हाला सांगितले.

'तुझं म्हणणं बरोबर आहे' असं म्हणून देवानं ती स्त्री त्याच्या स्वाधीन केली आणि देवीसह तो देवलोकी जाऊ लागला. वाटेने जाताना देवी त्याला म्हणाली, 'देवा ! बारीकसारीक गोष्टीत प्रामाणिकपणा दाखवणार्‍या माणसाचा तो प्रामाणिकपणा मोठया आणि महत्त्वाच्या गोष्टीत टिकत नाही. त्या लाकूडतोड्यानं चातूर्याच्या जोरावर तुम्हाला चक्क फसवलं देवा, तुमचं कसं व्हायचं?


MarathiMati.com - Android App on Google Play Store