NashikDiary.com
MarathiMati.com - Android App on Google Play Store

मृत्यूपुर्वीचे मागणे

Chaturya Katha - Mrutyupurviche Maagane

राजा सत्येंद्र याच्या राज्यावर स्वारी करुन त्याचा काही प्रदेश जिंकण्यासाठी, राजा बहुसायास याने आपला पराक्रमी व चतुर सेनापती अभंगधैर्य याला प्रचंड सैन्यानिशी पाठविले. पण राजा सत्येंद्र याच्या सैन्यानं पराक्रमाची शर्थ करुन शत्रुसैन्याचा दारुण पराभव केला, आणि त्यांचा सेनापती अभंगधैर्य याला पकडून, आपला राजा सत्येंद्र याच्याकडे नेले. त्या राजाने आपल्या एका सैनिकाला त्या सेनापतीचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली.

प्रत्यक्षात शिरच्छेद करण्यापूर्वी राजा सत्येंद्राने त्या शत्रूसेनापतीला विचारलं, 'तुझं मस्तक आता उडविलं जाणार आहे, तत्पुर्वी तुझी काही खायची वा प्यायची इच्छा असली, तर तू ती मला सांग. तुझी ती इच्छा पूर्ण केली जाईल, आणि मगच तुझा शिरच्छेद केला जाईल.

सेनापती अभंगधैर्य म्हणाला, 'महाराज ! माझा मृत्यू समोर ठाकला असताना, मला खाण्या-पिण्याची इच्छा कशी होणार? तरीसुध्दा मला अत्यंत तहान लागली असल्याने व अशा स्थितीत मृत्यू येणे मला योग्य वाटत नसल्याने, मला फक्त एक प्यालाभर पाणी दिले जावे.' राजानं सेवकाकरवी त्या सेनापतीला पाण्यानं भरलेला प्याला दिला. प्याला हाती आला असतानाही शत्रू-सेनापती तो प्याला नुसताच हाती धरुन स्वस्थ उभा राहिला असल्याचं पाहून, राजानं त्याला विचारलं, 'तुझ्या अंतिम इच्छेप्रमाणे, तुला पाण्यानं भरलेला प्याला देण्यात आला आहे, मग आता ते पाणी तू पीत का नाहीस?' अभंगधैर्य म्हणाला, 'मी हे पाणी पीत असतानाच शिरच्छेद करुन माझा प्राण घेतला जाईल, अशी मला भीती वाटते.'

राजा सत्येंद्र म्हणाला, 'हे पहा, हे पाणी पुर्णपणे प्यायल्यावरच तुझा शिरच्छेद केला जाईल, तोवर तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे मी तुला वचन देतो. मग तर झालं?' राजाने याप्रमाणे वचन देताच, अभंगधैर्यानं त्या प्याल्यातलं सर्व पाणी जमिनीवर ओतलं. ते पाणी जमिनीवर ओतलं जाताच, क्षणार्धात ते तिथल्या तिथे जिरुन गेलं. तो प्रकार पाहून राजा सेवकाला म्हणाला, 'शत्रूचा हा सेनापती, विनाकरण वेळकाढूपणा करीत आहे. याचं मस्तक उडव पाहू ?'

यावर शत्रू-सेनापती अभंगधैर्य म्हणाला, 'महाराज ! 'शब्दाला जागणारा राजा अशी आपली ख्याती आहे. अशा स्थितीत 'हे पाणी तू पुर्णपणे प्यायल्यावरच तुझा शिरच्छेद केला जाईल, तोवर तुझ्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही.' असं जे आपण मला नुकतंच वचन दिलं होतं, ते आपण मोडणार का ? खरं पाहता माझ्या हातातलं ते पाणी आता भुमीनेच पिऊन टाकलं असल्याने, मला ते कधीच पिता येणार नाही, आणि त्यामुळे दिलेल्या वचनाप्रमाणे आपण माझा शिरच्छेद यापुढे कधीही करणे योग्य ठरणार नाही,' शत्रूचा असला, तरी हा सेनापती अतिशय चतुर आहे हे पाहून राजा सत्येंद्र त्याच्यावर प्रसन्न झाला, आणि कोणत्याही राजाच्या सैन्याचं सेनापतीत्व वा अन्य अधिकारपद स्वीकारुन आपल्या राज्यावर कधीही चालून न येण्याचं त्याच्याकडून वचन घेऊन, राजा सत्येंद्राने त्याला सोडून दिले.