NashikDiary.com
MarathiMati.com - Official WhatsApp Number

तुला हवं, ते त्याला दे

Chaturya Katha 10 - Tula Have Te Tyala De

एका श्रीमंत माणसाने मरण्यापूर्वी मृत्युपत्र केले. त्यात त्याने, आपला एकुलता एक मुलगा अजून 'सज्ञान' झाला नसल्याने आपल्या मृत्यूनंतर आपल्या स्थलावर व जंगम मालमत्तेची देखरेख आपला परम मित्र देवेंद्र आधाशे याने करावी, आणी आपला मुलगा सज्ञान होताच, आपल्या मित्राने एकूण मालमत्तेतील त्याला हवा तो भाग माझ्या मुलाला दयावा व उरलेला भाग त्याने स्वत:ला घ्यावा, असे लिहिले. हे मृत्युपत्र करुन झाल्यावर तो गृहस्थ मरण पावला.

चार वर्षांनी त्या मृत मनुष्याचा मुलगा कायद्याच्या दृष्टीने सज्ञान म्हणजे अठरा वर्षांचा झाल्यावर, त्याने त्या देवेंद्र आधाशेकडे आपल्या वडिलांच्या मालमत्तेवरील ताबा मागितला. तेव्हा त्या अधाशी आधाशेने मृत मित्राच्या चाळीस शेतांपैकी फक्त एक शेत, चार घरापैंकी फक्त एक घर आणि बॅंकेतील एक लाख रुपयांपैकी केवळ पाच हजार रुपये त्याच्या मुलाला देऊ केले. या दगलबाजीमुळे भडकून गेलेल्या त्या मुलाला आधाशे म्हणाला, 'तुझ्या वडिलांनी मृत्युपत्रात 'मला हवं ते मी तुला द्यावं व उरलेलं मी घ्यावं,' असं स्पष्ट लिहिलं असल्यामुळे, माझ्या मर्जीनुसार मी जे तुला देतो आहे, ते तू निमुटपणे घे; नाहीतर मी तेही तुला देणार नाही.'

आपल्या वडिलांच्या मित्राने केलेल्या फसवणुकीबद्दल त्या मुलाने त्याच्याविरुध्द न्यायालयात दावा केला. दाव्याची सुनावणी सुरु होताच न्यायमुर्तींनी त्या लुच्च्या गृहस्थाला विचारलं, 'देवेंद्र आधाशे ! तुझ्या मित्रान मृत्युपुर्वी जे मृत्युपत्र केलं, त्यात काय लिहिलं आहे ?' आधाशे म्हणाला, 'हे पहा ते मृत्यूपत्र. यात स्पष्ट लिहिलं आहे, की माझ्या मित्राला हवं ते त्याने माझ्या मुलाला द्यावे व बाकीचे त्याने घ्यावे.'

न्यायमुर्तींनी पुन्हा विचारलं, ' मग आधाशे ! तुझ्या तुझ्या मित्राच्या स्थावर-जंगम मालमत्तेपैकी तुला काय काय हवे ?' आधाशे म्हणाला, ' माझ्या दिवंगत मित्राच्या चाळीस शेतांपैकी ३५ शेते, चार घरांपैकी तीन घरे, आणि बँकेतील त्याच्या खाती असलेल्या एक लाख रुपयांपैकी पंच्याण्णव हजार एवढे मला हवे.' यावर न्यायमुर्ती म्हणाले, 'तुझ्या मुत्राने मृत्युपुर्वी केलेल्या मृत्युपत्रात ज्या अर्थी 'तुला हवे ते तू त्याच्या मुलाला द्यावे' असे लिहिले आहे, आणि ज्याअर्थी तुला पस्तीस शेते, तीन घरे व पंच्च्याण्णव हजार रुपये हवे आहेत, त्याअर्थी तुला हवे असलेले हे सर्व तू या मुलाला दे आणि उरलेली पाच शेते व एक घर आणि पाच हजार रुपये तू स्वत:कडे ठेव.' मृत्युपत्रातील भाषेचा न्यायमुर्तींनी जो चातुर्यपूर्ण अर्थ लावला, त्यामुळे त्या अधाशी आधाशेचा आवाज बंद झाला आणि निर्णयानुसार त्याने त्या मुलाला त्याचा योग्य वाटा देऊन टाकला.


Book Home in Konkan