प्राप्तीचा अर्धा वाटा
विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याच्या दरबारात एकदा विश्वजित या नावाचा एक नामवंत जादूगार आला व त्याने 'कुणाही जादूगारानं माझ्यासमोर यावं आणि मला येणार नाही असा जादूचा प्रयोग करुन दाखवावा, 'असं त्या राज्यातील सर्व जादूगारांना आव्हान दिलं.
ते आव्हान ऎकून त्याच्याकडे अनेक जादूगार दाखविले, पण कुणीही जादूगार जो कोणताही प्रयोग करुन दाखवी, तो प्रयोग जादूगार विश्वजित करुन दाखवी व आलेल्या जादूगारला शरणागती पत्करायला लावी.
पंधरा सोळा वर्षांच्या तेनाली रमणच्या कानी ही बातमी गेली. तो एका पुढील मिरच्यांची भुक्की घेऊन राजवाड्याकडे गेला. परंतू देवडीवरच्या पहारेकऱ्यानं त्याला अडवलं व राजाची भेट घेण्याचं कारण विचारलं.
रमण म्हणाला, 'दरबारात आलेल्या जादूगाराचं आव्हान स्विकारुन, मी त्याला असा एक प्रयोग करुन दाखविणार आहे, की जो त्या जादूगाराला करुन दाखविता न आल्याने त्याचा पराभव होईल व माला राजाकडून मोठं इनाम मिळेल.'
पहारेकरी म्हणाला, 'तुला सोडतो, पण तुझ्या प्राप्तीचा अर्धा वाटा मला देशील ?'
'जरुर, पण तू मला आत जाऊ दे.' रमण असं म्हणताच पहारेकऱ्यानं त्याला आत सोडलं.
पण वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या पहारेकऱ्यानंही त्याला अडवलं व राजाकडे जाण्याचं त्याला कारण विचारलं. रमणने कारण सांगताच तोही म्हणाला, 'तुला मी आत सोडतो, पण राजाकडून होणाऱ्या प्राप्तीचा अर्धा वाटा तू मला देशील ?' त्यालाही होकारार्थी उत्तर देऊन रमणनं राजवाड्यात प्रवेश मिळविला.
राजाची भेट होताच व रमणनं त्याला आपल्या येण्याचा उद्देश सांगताच, राजानं त्याची व जादूगार विश्वजित यांची भेट घडवून आणली. रमणचं वय पाहून खदखदून हसत विश्वजित त्याला म्हणाला, 'मुला ! मी मी म्हणणाऱ्यांनी मजकडे येऊन स्वत:ची शोभा करुन घेतली; आता तू आलास का ? मला करता येणार नाही असा प्रयोग करायचा आहे बरं का तुला ?'
न डगमगता रमण म्हणाला, 'ठाऊक आहे मला ते. पण माझी एकच अट आहे. मी जो प्रयोग मिटल्या डोळ्यांनी करुन दाखवीन, तो प्रयोग तू उघड्या डोळ्यांनी करुन दाखवायचा. स्वीकारतोस माझं आव्हान ?'
म्हणजे तर आपलं काम अधिकच सोपं झालं असं वाटून त्या जादूगारानं आव्हान स्वीकारताच, रमणनं खिशातून मिरच्यांच्या भुक्कीची पुडी काढून ती राजा व विश्वजित यांच्या समक्ष उघडली आणि तो जादूगाराला म्हणाला, 'मी ही पूड माझे डोळे मिटून माझ्या पापण्यांवर ठेवतो, पण तू ती तुझे डोळे उघडे ठेवून पापण्यांवर ठेवून दाखव. आहे तयारी ?'
रमणच्या या युक्तीमुळं थक्क झालेल्या त्या जादूगारानं ताबडतोब नकार देऊन शरणागती पत्करली. रमणच्या चातुर्यावर प्रसन्न झालेल्या राजानं त्याला विचारलं, 'रमण मी तुला काय देऊ ?'
मला शंकर फ़टके द्या.' रमणने उत्तर दिले.
रमणच्या या विक्षिप्त मागणीमुळं अचंब्यात पडलेल्या राजानं त्याला त्याने केलेल्या या आत्मघातकी मागणीचं कारण विचारताच ती म्हणाली, 'महाराज ! जादूगार विश्वजित याचं आव्हान स्वीकारण्यासाठी मी प्रथम देवडीपाशी आलो, तेव्हा तिथल्या लाचखाऊ पहारेकऱ्यानं मला आपल्याकडून मिळणाऱ्या इनामाचा निम्मा वाटा त्याला देण्याच्या अटीवर मला राजवाड्यासमोरच्या अंगणात सोडलं. पुढं प्रत्यक्ष राजवाड्याच्या मुख्य द्वारापाशी आलो, तर तिथल्या पहारेकऱ्यानंही तशाच अटीवर मला राजवाड्यात येऊ दिलं. तेव्हा हे शंभर फ़टके मला मिळणार नसून, त्यांची वाटणी त्या दोन पहारेकऱ्यांमध्येच सम प्रमाणात व्हायची आहे.'
रमणच्या या बोलण्यानं राजाचया डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यानं त्या दोन काचखाऊ पहारेकऱ्यांना प्रत्येकी पन्नास फ़टक्यांची शिक्षा देऊन त्यांना नोकरीतून काढले आणि रमणला मॊठे बक्षीस दिले.
|