फ़ोडा आणि झोडा
एका माणसाचा उसाचा भला मोठा मळा होता. त्या मळ्यात तो उसाच्या रसापासून गूळही बनवी.
त्या मळ्यात काही वानरं येऊ लागली. तो मळेवाला त्यांना गुळाचे बारीक बारीक खडे खायला घालू लागला. पण हळूहळू त्या वानरांना त्या गुळाची चटक लागली आणि ती आपल्या इष्टमित्रांसह तिथे येऊ लागली.
असं होता होता वानरांची संख्या वाढली, की 'एवढ्यांना गूळ कसा खायला घालायचा,' असा त्या मळेवाल्यांपुढं प्रश्न पडला. बरं त्यांना गूळ न द्यावा, तर ती त्या मळेवाल्याला व त्याच्या नोकरांना नाना तऱ्हांनी हैरान करु लागला !
या वानरांची कटकट कायमची कशी नाहीशी करायची?' या गोष्टीचा विचार करीत असता, मळेवाला मनात म्हणाला, 'काही झालं तरी माणसंसुध्दा वानरांपासूनच विकसित झालेली. त्यामुळं क्षुल्लक स्वार्थासाठी एकमेकांची डोकी फ़ोडण्याचा माणसांचा दुर्गुण, या त्यांच्या पूर्वजांतही असणार... त्याचा फ़ायदा उठवून, आपण त्यांच्यात भांडण लावून दिलं की आपल्याला आपलं काम साधून घेता येईल.'
असा विचार करुन मळेवाल्यानं एका नोकराला सांगितल, 'हे बघ दामू ! रोजच्याप्रमाणे गुळाचे बारीक बारीक खडे करुन, एकेक खडा एकेका वानराला घालत न बसता आज तू गुळाची एक अख्खी ढेपच त्या झाडाखाली ठेव, आणि त्या ढेपेच्या आजूबाजूला चांगले टणक पण तोकडे असे पाच-पंचवीस दांडगे विखरुन ठेव.' दामूने 'असं का करायचं ?' याच्या चौकशीत न शिरता, मालकाने सांगितल्याप्रमाणे केले.
ठरलेल्या वेळी, तो चांगला पाच-पन्नास वानरांचा कळप त्या मळ्यात आला. आज गुळाच्या बारीक बारीक खड्यांऎवजी अख्खी ढेपच त्यांच्या दृष्टीस पडताच, तिचे चावे घेण्यासाठी त्यांच्यापैकी प्रत्येक वानर अहमहमिकेनं तिच्याकडे जाऊ लागला.
एवढ्या वानरांना एकाच वेळी त्या एकाच ढेपीपाशी जाऊन तिचे चावे घेता येणे शक्य नव्हते. साहजिकच ती एकमेकांचे पाय खेचून व परस्परांना मागे ढकलून स्वत: पुढे जाण्याचा प्रयत्न करु लागली.
पण गूळ खायला न मिळता नुसती ओढाताण सुरु झाल्यामुळं चिडून गेलेल्या त्या वानरांनी अखेर आजूबाजूला पडलेली दांडकी हाती घेतली व एकमेकांची टाळकी फ़ोडायला सुरुवात केली.
अखेर 'गूळाऎवजी वाट्याला, बेदम मार येऊ लागला आहे' असे पाहून, ती वानरे ती गुळाची ढेप होती तिथे व होती तशी टाकून, तिथून जी निघून गेली, ती पुन्हा त्या मळ्याकडे फ़िरकलीच नाहीत !
|