मग राजा गप्प झाला.
फ़्रान्सचा राजा तिसरा नेपोलिअन याने आपल्या राजवाड्यावर सुप्रसिध्द पियानोवादक बुलो याचा पियानोवादनचा कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमाला राजदरबारी मंडळी आणि बरेच निवडक पाहुणे आले होते. कार्यक्रमाला रंगतदार सुरुवातही झाली.
आपल्या कार्यक्रमात इतर सर्व श्रोते तल्लीन होऊन गेले असताना, राजा नेपोलिअन मात्र त्याच्याजवळ बसलेल्या मित्राशी गुजगोष्टी करीत राहिला आहे व त्याचे बोलणे काही केल्या थांबत नाही असे पाहून, निर्भीड बुलोने आपले पियानोवादन एकाएकी बंद केले !
त्याच्या या कृतीने सर्वजण गोंधळून गेले असता स्वत: नेपोलिअननं त्याला विचारलं, 'काय बुलो ! पियानोवादन एकाएकी बंद का केलेत ?'
यावर तो स्वाभिमानी कलावंत राजाल उद्देशून उपरोधाने म्हणाला, 'महाराज ! इतर कुठे न बोलता येण्यासारख्या गोष्टी आपण आपल्या मित्रापाशी बोलत असताना, मी माझे वादय वाजवून आपल्या बोलण्यात व्यत्यय आणणे योग्य होईल का ?'
बुलोच्या या सणसणीत टोमण्याने नेपोलिअन वरमला आणि त्याने केविलवाणे हसत त्याला कार्यक्रम पुढे चालू करायला सांगून, उर्वरीत सर्व कार्यक्रम एक शब्दही न बोलता ऎकला.
|