शिव्या उलटवल्या
एका वक्त्याचं भाषण संपतासंपत, तो श्रोत्यांना उद्देशून म्हणाला, 'माझे भाषण संपल्यावर, मी ज्या विषयावर बोललो, त्या संबंधात कुणाला काही प्रश्न विचारायचे असले, तर त्यांनी ते तोंडी अथवा चिठ्ठयांवर लिहून मला विचारावेत. मी माझ्या परीने त्यांची समाधानकारक उत्तरे देईन.'
याप्रमाणे बोलून वक्याने आपले भाषण संपविले. तो खुर्चीवर बसला आणि श्रोत्यांपैकी अनेकजण तोंडी वा चिठ्ठयांवर आपापले प्रश्न लिहून, त्या चिठठया हस्ते परहस्ते वक्त्याकडे पाठवू लागले.
आलेला चिठठयांपैकी एक चिठठी उघडून पाहता, वक्त्याला तिच्यावार फ़क्त 'मूर्ख ...हरामखोर...पाजी' अशा तीन शिव्याच लिहिल्या असल्याचे आढळले.
तेव्हा तो वक्ता श्रोत्यांना उद्देशून म्हणाला, 'माझ्याकडे आलेल्या एका चिठठीत 'चिठठी पाठविणाऱ्यांन फ़क्त 'मूर्ख ...हरामखोर...पाजी' असं त्यांच संपूर्ण नावच लिहिलं आहे; परंतू तिच्यावर त्यानं प्रश्न लिहिला नसल्यानं मी त्याला काहीच उत्तर देऊ शकत नाही.'
वक्त्याने मोठ्या चातूर्याने एका शिवराळ माणसाच्या शिव्या त्याच्यावर उलटवल्याचे पाहून, श्रोत्यांनी त्याला हशाची व टाळ्यांची जोरदार दाद दिली.
|