मित्राची हजामत
बगदादला महमंद नावाचा एक नामवंत न्हावी होता. मोठयामोठया अमीर उमरावांचेच काय, पण प्रत्यक्ष खलीफ़ा हरुन अल रशीद यांचेही केस तोच कापी.
एके दिवशी एक लाकूडविक्या आपल्य गाढवावरील लाकडी खोगिरावर लाकडांचं ओझं लावून रस्त्यानं चालला असता महंमद न्हाव्याने त्याला विचारलं, 'काय रे युसुफ़ ? गाढवाच्या पाठीवरच्या सगळ्या लाकडांचे किती पैसे घेशील ?'
युसफ़नं सांगितलेली किंमत योग्य वाटल्याने महंमद न्हावी त्याला पैसे देऊन म्हणाला, 'हे पैसे घे आणि पाठीवरील लाकडी खोगिरासह सर्व लाकडं अंगणात टाक.
महंमद न्हाव्याचं ते बोलणं एकून युसुफ़ म्हणाला, 'मी फ़क्त तुला लाकडांचीच किंमत सांगितली होती, त्या लाकडात लाकडी खोगिराचा समावेश नव्हता.'
याउलट महमंद न्हावी म्हणाला, 'मी तुला गाढवाच्या पाठीवरच्या सर्व लाकडांची किंमत विचारली होती आणि तू सांगितलेली किंमत मी तुला दिली. गाढवाच्या पाठीवर खोगीर लाकडाचंच असल्यामुळे त्याच्या पाठीवरल्या लाकडात त्या खोगिराचाही समावेश होतो. तेव्हा निमूटपणे ते खोगीरही तू मला दिलं पाहिजेस.'
अखेर हे प्रकरण काझीकडे गेलं. दोन्ही बाजू ऎकून घेऊन काझी युसुफ़ला म्हणाला, 'तुझ्या बाजूला सत्य असेल, पण आंधळी न्यायदेवता करारातील शब्दांच्या अभिप्रेत अर्थापेक्षा अक्षरक्ष: अर्थाला जास्त महत्त्व देत असल्याने व गाढवाच्या पाठीवरील लाकडांत लाकडी खोगिराचाही समावेश होत असल्याने, महंमदला इतर लाकडांबरोबर ते लाकडी खोगीर देणे तुझे कायदेशीर कर्तव्य आहे.'
काझीच्या निर्णयाप्रमाणे युसुफ़ने इतर लाकडांबरोबर ते खोगीरही महंमद न्हाव्याचया हवाली केले. पण दुसऱ्या दिवशी तो प्रत्यक्ष खलीफ़ा हरुन अल रशीदकडे गेला व त्याने आपल्यावर झालेला अन्याय त्याच्या कानी घातला. खलीफ़ाने त्याला एक युक्ती सांगितली.
खलीफ़ाच्या सांगण्यावरुन युसुफ़ हा महंमद न्हाव्याकडे गेला व त्याला म्हणाला, 'महंमदभाई, काझीसाहेबांनी तुझ्या बाजूचा निर्णय दिल्यामुळे, झालं गेलं विसरुन मी तुला एक विनंती करायला आलोय. ज्याच्या जीवावर मी आज चार घास सुखात खातोय अशा माझ्या मित्राचे केस कापण्यासाठी तू कृपा करुन माझ्या घरी ये. मला ठावूक आहे की तू श्रीमंताचा न्हावी आहेस; तुझे दर इतरांच्या दुप्पट आहेत; पण वाटल्यास तेवढे पैसे मी तुला आगाऊ देतो. हे
घे. आता तरी येतोस ?'
युसुफ़ने दिलेले चार दिनार खिशात टाकून महंमद त्याच्यासंगे त्याच्या घरी गेला व म्हणाला, 'कुठे आहे तो तुझा मित्र ?'
अंगणात बांधलेल्या गाढवाकडे बोट दाखवून युसुफ़ म्हणाला, हाच तो मला माझ्या लाकडे विकण्याच्या धंद्यात मदत करणारा माझा परममित्र. काप याचे सारे केस.'
महंमद न्हावी गाढवाचे केस कापायला तयार होईना म्हणून युसुफ़ने खलिफ़ाकडे तक्रार केले. खलिफ़ाने युसुफ़चे म्हणणे ऎकून घेतल्यावर महंमद न्हावी खलीफ़ाला म्हणाला, 'खाविंद ! गाढव हा कधी माणसाचा मित्र होऊ शकतो?'
खलिफ़ा म्हणाला, 'मित्र कुणाला मानायचं हे ज्याच्या मनावर असतं. खोगीर जर लाकडांत जमा होऊ शकतं, तर गाढव मित्रात का जमा होऊ नये ? तुला त्याचे केस कापलेच पाहिजेत.'
खलीफ़ाने निर्णय दिल्यामुळे श्रीमंतांचा न्हावी महंमद याजवर युसुफ़चया मित्राचे केस कापण्याची वेळ आली व त्यामुळे त्याची नाचक्की होऊन श्रीमंत गिऱ्हाइके सुटली !
|