मग मला कामच कुठं राहिलं ?
इसाप हा मूळचा तुर्कस्थानातील सिसिलिया प्रांतातला. त्याच्या गावावर एकदा चाच्यांची धाड आली. इसाप हा त्या वेळी लहान होता. चाच्यांनी त्याच्या आईला गलबतातून कुठेतरी नेले. धाड आली त्या वेळी त्याचे वडील एका व्यापाऱ्यासंगे कुठल्यातरी गावी गेले होते. चाच्यांनी इसापला पकडले आणि दूरच्या गावी असलेल्या गुलामांच्या बाजारात गुलाम म्हणून विकण्यासाठी उभे केले.
इसापबरोबर गुलाम म्हणून विकण्यासाठी आलेली इतर माणसं चांगली तरुण व देखणी होती. त्यांच्या मानानं इसाप हा लहान-म्हणजे अवघा बारा तेरा वर्षांचा-होता, एवढचं नव्हे तर, कुरुपही होता.
गुलामांच्या बाजारात गुलाम खरेदी करण्यासाठी आलेल्या झांथस नावाच्या एका इसमानं इसापच्या शेजारी उभ्या असलेल्या दुसऱ्या गुलामाला विचारलं, ' काय रे? तुला काय काय येतं ?'
तो म्हणाला, 'मला कुठलंही काम करता येतं.'
नंतर त्या इसमानं कुरुप आणि वयानं लहान असलेल्या इसापला विचारलं, ' काय रे मुला ? तुला काय येतं?'
इसाप म्हणाला, 'याला जर कुठलही काम करता येतं, तर मग मला करायला कामच कुठलं राहिलं?'
इसापचे हे चातुर्ययुक्त उत्तर ऎकून, झांथसने त्यालाच खरेदी केलं.
|