चमच्यांचा चमत्कार !
एका गृहस्थाकडे मेजवाणीसाठी चाळीस जणांना बोलावले होते, त्यापैकी वीसजणांनी श्रीखंडाच्या वाटीत दिलेला एकेक चमचा जेवण संपता संपता चाटून व स्वच्छ करुन, आपापल्या खिशात घुसडला !
नोकराने ही गोष्ट यजमानाच्या दृष्टीस आणताच यजमान हाती लागलेले २० चमचे घेऊन निमंत्रित पाहुण्यांसमोर आले आणि त्यांना उद्देशून म्हणाले, 'आपण सर्व माझ्या निमंत्रणाला मान देऊन जेवयला आलात, म्हणून मला अतिशय आनंद झाला. माझ्याकडे येऊन मलाजसे तुम्ही आनंदित केलेत, तसेच तुम्हीही आता घरी जायला निघाला असता, तुम्हांला आनंदित करुन सोडावे म्हणून मी माझ्या अंगात असलेल्या जादूच्या कलेची थोडीशी चुणुक तुम्हाला दाखवितो.'
याप्रमाणे बोलून व आपल्या हातत असलेले वीस चमचे मोजून दाखवून, चतुर यजमान पुढं म्हणाला, 'आता माझ्या हातात असलेले चमचे बरोबर वीस आहेत, हे मी तुम्हाला मोजूनच दाखविले. तेव्हा हे वीस चमचे मी माझ्या खिशात घालतो, आणि ते सर्व चमचे मी तुमच्या पैकी वीस जणांच्या खिशातून काढून दाखवितो.'
याप्रमाणे बोलून व ते चमचे आपल्या खिशात घालून, त्या यजमानाने प्रत्येक पाहुण्याचा खिसा चाचपला आणि एकूण वीस चमचेचोरांच्या खिशातून वीस चमचे बाहेर काढले व ते आपल्या गड्याच्या स्वाधीन केले.
आलेल्या पाहुण्यांचा अपमान होऊ न देता, चोरीस गेलेले सर्व चमचे मिळविण्याची त्या यजमानांचे युक्ती खरोखरच किती अपूर्व होती !
|