गाढवाची सावली
अथेन्स नगरीतील मुख्य चौकात प्रचंड सभा भरली होती. अशी प्रचंड सभा त्या नगरीत त्यापूर्वी कधीच भरली नव्हती. अर्थात त्याला कारणही तसचं होत. अथेन्स नगरीवर परचक्र येण्याचा संभव उत्पन्न झाला होता. लोकांच्या जीवनावर भयानक भवितव्यतेचं सावट पडलं होत.
मातृभूमीचय स्वातंत्र्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी स्थानिक विचारवंतांनी ग्रीसमधील ख्यातनाम वक्ता डेमास्थेनीस याचे भाषण ठेवले होते. त्या योजनेनुसार त्या विराट सभेपुढे डेमास्थेनीस यानी भाषण करायला सुरुवात केली, पण तो बोलू लागला असता लोक आपापसात बोलून एवढा गोंगाट करु लागली की, त्यांच्यापुढे त्याला बोलता येईना.
प्रसंगाच्या गांभीर्याची लोकांना परोपरीने कल्पना देऊनही लोक लक्ष देत नाहीतसे पाहून, डेमास्थेनीस हात वर करुन त्यांना म्हणाला, 'बंधूनो ! मी तुमचा आता फ़ार वेळ घेत नाही. फ़क्त एक छोटी व मजेदार गोष्ट तुम्हाला सांगणार आहे आणि तुमची रजा घेणार आहे.' डेमास्थेनीसने याप्रमाणे सांगताच, लोक एकदम गप्प झाले.०
लोक गप्प राहिल्याचे पाहून डेमास्थेनीस म्हणाला, ' कडक उन्हाळ्याचे दिवस होते. एका तरुणाने बाहेरगावी जाताना बसण्यासाठी एकाचे गाढव भाड्याने घेतले. त्या गाढवावर बसून तो गावी जाऊ लागला. पाठोपाठ त्या गाढवाचा मालकही चालत होता. जाता जाता वाटेत ऊन एवढं तापलं की, तो तरुण त्या गाढवावरुन खाली उतरला आणि त्याच्या सावलीत बसला. त्याबरोबर त्या गाढवाचा मालक त्या तरुणाला म्हणाला, 'हे पाहा, मी जे गाढव तुला भाड्याने दिले आहे, ते केवळ तुला त्यावर बसण्यासाठी, तेव्हा त्याच्या सावलीचा उपभोग घेण्याचा अधिकार तुला नसून, त्या सावलीवर सर्वस्वी माझा हक्क आहे.'
यावर तो तरुण म्हणाला, 'हे पाहा, हे गाढव ज्याअर्थी मी आजच्यापुरतं तुझ्या कडून भाड्याने घेतले आहे, त्याअर्थी याच्या सावलीवरसुध्दा आज माझाच हक्क आहे.'
गाढवाच्या सावलीचा उपभोग कुणी घ्यायचा, यावरुन त्या दोघांमध्ये जबरदस्त भांडण सुरु झालं कुणीच माघार घेईना. अखेर ते प्रकरण त्यांनी न्यायालयात नेलं. न्यायालयात त्या दोघांच भांडण ऎकून घेतल्यावर न्यायमुर्तींनी मोठा गंमतीदार निर्णय दिला. तो निर्णय तुम्हाला ऎकायचा असेल, तर तुम्हा सर्वांना आणखी थोडा वेळ स्तब्ध राहावे लागेल. तसे राहण्याची तुमची तयारी आहे का?'
समोर बसलेले श्रोते एका सुरात ओरडले, 'हो हो ! तो निर्णय ऎकायला आम्ही उत्सुक आहोत. त्याकरिता आम्ही वाटेल तेवढा वेळ गप्प बसायला तयार आहोत.'
त्यांच ते बोलणं ऎकून डेमास्थेनीस त्यांच्याकडे पाहून पुढं म्हणाला, 'गाढव भाड्याने घेतलेला तो तरुण व गाढवाचा मालक याचं म्हणणं ऎकून झाल्यानंतर न्यायाधीश म्हणाले, जे लोक गाढवाच्या सावलीचा उपभोग कुणी घ्यायचा, अशा क्षुल्लक प्रश्नासाठी आपापसांत भांडून अखेर न्यायालयापर्यंत येण्याची मजल गाठतात ते तर गाढव असतातच, पण आपल्या मायभूमीवर परकीय आक्रमण येण्याची भीती उत्पन्न झाली असता, त्या संकटापासून मायभूमीचं व आपलं रक्षणा कसं करायचं यावर चाललेल्या महत्त्वाच्या भाषणापेक्षा ज्यांना गाढवाचा मालक व गाढव भाड्याने घेणारा तरुण यांच्यात चाललेल्या भांडणाचा निकाल जाणून घेणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं, ते सवाई गाढव असतात.'
डेमास्थेनीस ने मोठ्या युवतीने दिलेल्या या जबरदस्त टोल्यामुळे लोक लज्जित झाले, आणि त्यांनी त्याचे पुढले सर्व भाषण अत्यंत शांतपणे ऎकून घेतले.'
|