हुशार हेमंत
निरनिराळ्या दुकानातून सामान खरेदी करता करता, चारुशिलाबाईचा पैशांच बटवा हातातून कुठेतरी पडला. बटवा पडल्याचे लक्षात येताच, कावऱ्याबावऱ्या होऊन त्या इकडेतिकडे फ़िरत बटव्याचा शोध घेऊ लागल्या.
आता निराश मनानं त्या घराच्या रस्त्याला लागणार, तोच परिस्थितीनं गरिब पण बुध्दीनं तल्लख व प्रामाणिक असा बारा तेरा वर्षाचा हेमंत, हाती बटवा घेऊन त्यांच्यापाशी गेला व म्हणाला, 'मावशी ! काय शोधता तुम्ही ?'
बाई - बटवा पडला रे माझा कुठेतरी !
हेमंत - मला रस्त्यावर पडलेला एक बटवा नुकताच सापडला आहे. बघा हाच आहे का तुमचा ?
बाई - होय होय ! हाच तो माझा हरवलेला बटवा !
याप्रमाणे बोलून चारुशिलाबाईनी तो बटवा हाती घेऊन उघडून पाहिला व त्या आश्चर्यानं म्हणाला, 'अरेच्चा ! असं कसं झालं?"
हेमंत - काय झालं? पैसे कमी झाले का बटव्यातले ?
बाई - छे छे ! पैसे कमी झाले नाहीत. पण माझ्या बटव्यात एकच शंभराची नोट होती. तिच्या जागी आत दहा दहाच्या नोटा आहेत ! असं कसं काय झालं?
यावर हेमंत मान खाली घालून म्हणाला, 'त्याचं काय आहे मावशी ? गेल्या रविवारीसुध्दा अशाच एका बाईचा रस्त्यात पडलेला बटवा मला मिळाला. त्या बटव्याच्य शोधासाठी इकडे तिकडे फ़िरणाऱ्या बाई दृष्टीस पडताच मी तो त्यांना परत केला. पण बटवा उघडून त्या मला म्हणाल्या, 'बाळा ! माझ्या बटव्यात शंभर रुपयांची एकच बंदी नोट आहे रे ! नोटेऎवजी दहा रुपयांच्या दहा नोटा जर असत्या, तर त्यातली एक नोट मी तुला तुझ्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून नक्कीच दिली असती. ठीक, तुझ्या प्रामाणीकपणाचे बक्षीस देव तुला नक्कीच कधीतरी अवश्य देईल.' एवढं बोलून व मला बक्षीस देण्याची जबाबदारी देवावर टाकून त्या बाई तिथून सरळ निघून गेल्या !
'आजच्या माझ्या प्रामाणिकपणाचे बक्षीस मला देण्याची जबाबदारीसुध्दा त्या बिचाऱ्या देवावर पडू नये, म्हणून मीच शंभराच्या बंद्या नोटेच्या दहा दहाच्या दहा सुट्या नोटा करुन घेतल्या आणि त्या बटव्यात भरल्या.'
आता त्या बाईला बोलायला हेमंतने वावच ठेवला नसल्याने, तिने त्याच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून दहा रुपयांची एक नोट निमूटपणे त्याच्या हातावर ठेवली.
|