चोरा, तुझ्या हाती माझी संपत्ती सुरक्षित होती.
एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या पैशांवर एका चोराचा कितीतरी दिवसांपासून डोळा होता. पण वाड्याभोवती व दुकानाभोवती अहोरात्र पहारेकरी व उग्र प्रकृतीचे कुत्रे यांचा जागता पहारा असल्याने त्या चोराला चोरी करण्याची संधी लाभेना. अखेर तो व्यापारी दुकानात ठेवायच्या मालाच्या खरेदीसाठी अधूनमधून मोठ्यामोठ्या रकमा घेऊन बाहेरगावी जात असल्याचे त्या चोराला कळल्याने, अशाच एखाद्या प्रवासात त्याच्यावर डल्ला मारण्याचा त्या चोराने बेत केला. त्यानुसार त्याने सभ्य माणसाचा पोषाख करुन व आपणही बाहेरगावचे एक बडे व्यापारी असल्याचे त्या श्रीमंत व्यापाऱ्याला सांगून, त्याच्याशी मैत्रीचे संबंध जोडण्याचा प्रयत्न सुरु केला. त्या श्रीमंत पण धूर्त व्यापाऱ्याला मात्र या नव्या दोस्ताच्या सज्जनपणाबद्दल संशय येत होता.
एकदा तो व्यापारी नेहमीप्रमाणे दुकानात ठेवायच्या मालाच्या खरेदीसाठी बाहेरगावी जायची तयारी करु लागला असता, सभ्य पेहेरावातील तो चोर त्याच्याकडे गेला व म्हणाला, ' शेठजी ! ज्या गावी आपल्याला जायचं आहे त्याच गावी माझंही महत्त्वांच काम आहे, तेव्हा आपल्याबरोबर मीही येऊ का?' चोराच्या या प्रश्नामागचा त्याचा हेतू काय आहे हे त्या व्यापाऱ्याला कळले, पण तरीही त्यानं होकार दिला. दुसऱ्याच दिवशी सकाळे ते दोघेही प्रवासाला निघाले.
ज्या गावी त्या व्यापाऱ्याला जायचं होतं, ते गाव बरचं दूर होतं. त्या काळी मोटारगाड्या आणि प्रवासी बससेवाही नव्हती. प्रवास एक तर बैलगाडीनं किंवा पायी होई. त्यामुळं ते दोघे पायीच प्रवास करु लागले. वाटेत रात्र झाली की, एखाद्या गावाबाहेरच्या धर्मशाळेत मुक्काम करायचा, असं त्यांनी ठरविलं होतं.
त्याप्रमाणे पहिल्या रात्री ते एका धर्मशाळेत उतरले. बरोबर आणलेली भाजी भाकर खाल्ली; आणि बाहेर असलेल्या विहिरीचं पाणी पिऊन ते अंथरुणात आडवे झाले.
व्यापारी गाढ झोपी गेल्याचं पाहून झोपेचं सोंग आणलेला चोर अंथरुणावरुन हळूच उठला व त्याने व्यापाऱ्यांच कपड्यांचं बोचकं सोडून तपासून पाहिलं. परंतू चाचपून पाहिले, पण कुठेच त्याला पैशांचा सुगावा लागेना !
दुसऱ्या दिवशी रात्रीही वाटेतील अशाच एका गावातल्या धर्मशाळेत त्या गावच्या बाजारात गेला, आणि त्याने एका मोठ्या घाऊक मालविक्रेत्याकडून बराचसा माल खरेदी केला व आपल्या बोचक्यात ठेवलेली दहा हजार रुपयांची थैली त्या व्यापाऱ्याच्या हवाली केली.
दोन रात्री आपण या व्यापाऱ्याच्या बोचक्याची कसून तपासणी केली असता आपल्या हाती काहीच लागलं नाही, मग आत्ताच याच्या बोचक्यातून यानं एवढ्या मोठ्या रकमेची थैली कशी काय काढली ? असा विचार त्या चोराला पडला. अखेर न राहवून त्यानं त्या व्यापाऱ्याला विचारलं, 'रघुवीरशेठी ! गेल्या दोन रात्री ही रक्कम तुम्ही कुठे हो ठेवली होती ?"
मिष्किलपणे हसत तो व्यापारी त्याला म्हणाला, 'तू कोण आहेस याची थॊडीफ़ार कल्पणा मला असल्याने आणि यापुढे हा व्यापारी माझ्या दुकानासाठी लागणारा माल दर महिन्यास घरपोच करणार असल्याने मी माझी युक्ती उघड करतो. धर्मशाळेत झोपण्यापूर्वी तू लघवीला गेलास, की ही पैशांची थैली मी तुझ्या बोचक्यात दडवून ठेवीत होतो आणि सकाळी लवकर उठून माझे प्रातविर्धी उरकून झाल्यावर तुला उठवीत होती. उठल्यावर तू शौचाला गेलास की तुझ्या गाठोड्यातील थैली काढून मी ती माझ्या गाठोड्यात ठेवून देत होतो. दोन्हीही रात्री मी असचं केलं. रात्री तू तुझेच गाठोडे तपासून पाहणे शक्य नाही याची मला खात्री होती, म्हणून हे चोरा ! तुझ्या हाती माझी संपत्ती सुरक्षीत होती.'
|