११.
एक अडाणी माणूस पेन्सिलिनं कागदावर नुसत्याच रेघोट्या ओढत असल्याचे पाहून एका गृहस्थानं त्याला विचारलं, "काय रे! हे काय करतोस?"
अडाणी मनुष्य - गावी राहणाऱ्या मोठ्या भावाला मी पत्र लिहितोय.
दुसरा गृहस्थ - पण तू तर कागदावर नुसत्या रेघोट्या ओढतो आहेस. त्या तुझ्या भावाला कशा वाचता येणार? तुला लिहिता येत नाही का?
अडाणी मनुष्य - मला तर लिहिता वाचता येत नाहीच, पण माझ्या भावाला तरी कुठं लिहिता वाचता येतंय?
१२.
व्याकरणाच्या तासाला शिक्षिकेनं मोरूला विचारलं, " काय रे, `मी सुंदर आहे' या वाक्याचा `काळ' कोणता?"
तिच्या चेहेऱ्याकडे पाहून मोरूनं उत्तर दिलं, "भुतकाळ."
१३.
एका कवीनं आपल्या पत्नीला विचारलं, "काय गं? मी काल रात्री लिहिलेली कविता कुठे गेली? आपल्या बाळानं तर ती फाडून फेकून नसेल ना दिली?"
पत्नी शांतपणे म्हणाली, "तो बिचारा कशाला फाडून फेकील? त्याला तुमची कविता कोणत्या दर्जाची आहे, हे थोडंच कळतंय?"
१४.
जगातलं मृत्यूचं प्रमाण वर्गाला समजावून देताना गुरुजी म्हणाले, "माझ्या प्रत्येक श्वासागणिक या एकूण जगात एक माणूस मरत असतो."
गुरुजींचं हे विधान ऐकून चिंतूनं त्यांना विचारलं, "असं जर आहे, तर गुरुजी तुम्ही श्वास घेताचं कशाला?"
१५.
सलूनमध्ये गेलेला एक टक्कलवान गृहस्थ न्हाव्याला म्हणाला, "वास्तविक माझे सर्व मस्तक टकलाने व्यापलेले असल्यामुळे तू माझ्याकडून केस कापण्याचे पैसे - इतरांकडून घेतोस त्यापेक्षा - बरेच कमी घ्यायला हवेस."
यावर न्हावी म्हणाला "साहेब, तुमच्याकडून मी जे पैसे घेणार, ते तुमचे केस कापण्याचे नसून, अत्यंत परिश्रमाने तुमचे केस शोधून काढण्याचे आहेत."