६.
रस्त्यात दोन इसमांची भेट झाली. बोलता बोलता विषय टिळकांचा निघाला, तेव्हा पहिला म्हणाला, " लोकमान्य टिळकांचा `गीतारहस्य' हा ग्रंथ खरोखरच अलौकिक आहे नाही का?"
दुसरा-प्रश्नच नाही. त्या ग्रंथाल तोड नाही.
पहिला- तुम्ही वाचलाय का तो ग्रंथ?
दुसरा- नाही, पण तुम्ही?
७.
गिऱ्हाईकाची दाढी करून झाल्यावर न्हाव्यानं त्याला विचारलं, "साहेब! माझा वस्तरा कसा काय काय वाटला तुम्हाला?"
गिऱ्हाईक म्हणाले," न्हावीदादा, तुमच्य वस्तऱ्याला खरोखरच जगात तुलना नाही. तुम्ही वस्तऱ्यानं माझी दाढी करीत आहात, असं मला वाटलंच नाही."
हे ऐकून एकदम खुषीत आलेल्या न्हाव्यानं विचारलं, "असं? मग मी तुमच्या गालांवरून वस्तरा फिरवीत असताना तुम्हाला नेमकं कसं वाटत होतं?
गिऱ्हाईक म्हणाले, "खरं सांगायच तर, तुम्ही हाती खरखरीत पॉलिशपेपर घेऊन माझे गाल जोरात घाशीत असल्याचा मला भास होत होता."
८.
दिवाणखान्यात स्वेटर विणत बसलेल्या आपल्या आईपाशी जाऊन मन्यानं तिला लडिवाळपणे विचारलं, "आई गं, स्वैपाकघरातील फडताळातल्या डब्यातला एक लाडू खाऊ का मी?"
"खा बरं बाळ. भूक लागलीय् का तुला?"
आईचे हे शब्द कानी पडताच मन्या म्हणाला, "आई! तू लाडू खायला परवानगी दिलीस, म्हणून मला किती हायसं वाटलं! कारण तो लाडू मी अगोदरच खाऊन टाकला होता!"
९.
हॉटेलमध्ये गेलेला एक इसम गरमगरम मिसळ खात असता त्याला त्या मिसळीत एक मेलेलं झुरळ सापडलं. त्याबरोबर मिसळ आणून देणाऱ्या पोऱ्याला हाक मारून तो रागानं म्हणाला, "या मिसळीत बघ, मेलेलं झुरळ आलंय!"
यावर तो पोऱ्या म्हणाला, "तुम्हा गिऱ्हाइकांना मिसळ तर गरमागरम हवी असते. मग गरम मिसळीतलं झुरळ जिवंत कसं राहील? उष्णतेमुळं ते मरणारच."
१०.
गुरुजींनी विचारलं, "बाळू! शिवाजीमहाराजांचं एक वैशिष्ट्य तू सांगू शकशील का?"
बाळू - त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. कुठलीही गोष्ट त्यांच्या स्मरणात पक्की राहायची.
गुरुजी - (आश्चर्याने) कशावरून?
बाळू - म्हणून तर लोक त्यांच्या स्मरणार्थ जिकडे तिकडे त्यांचे पुतळे उभारतात.