युगायुगांच्या अंधारातून

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३१ ऑक्टोबर २०१२

युगायुगांच्या अंधारातून - मराठी कविता | Yugayuganchya Andharatun - Marathi Kavita

युगायुगांच्या अंधारातून
प्रकाशफुलांचे सडे ओंजळीत
काजव्यातली टिमटिम उर्जा
लुकलुकत्या रात्री सांभाळीत
चंद्र रोजचा सजतो आहे

विश्वाच्या आरंभबिंदूला
तेजाच्या अक्षुण्ण ज्योतीला
तळ्याकडेच्या चिखलामधले
विश्व झोपले ते सांभाळीत
चंद्र रोजचा झिजतो आहे

पाठीवर सपसपता सूर्य
चांदण्यात दिसते माधुर्य
वीजा लख्खकन कातरणाऱ्या
ढगाआडुनी पचवत लपवत
चंद्र रोजचा जळतो आहे