ये ना गं आई

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ जानेवारी २०१८

ये ना गं आई - मराठी कविता | Ye Na Ga Aai - Marathi Kavita

असशील तशी जवळ ये ना गं आई
तुझ्या पदराखाली मला झाक ना गं आई
मग दिसणार नाही अंधार मला
काही काळ तरी
तेवढीच जगेन क्षणभर
ये ना गं आई

घरटं माझं सावरायला ये ना गं आई
काही काळ निवांत राहिल मी आई
मोडणार नाही घरटं तुझ्यामुळे तरी
एवढीच आस जागते उरी
पण येशील ना गं आई

तुझी मायेची चौघडी माहेरीच राहिली
प्रश्नांच्या गराडयात मी गोहूनच गेले
भावना माझ्या गोठण्याआधी
उब देशील ना आई
खरंच लवकर येशील ना गं आई

जन्म देऊन कर्तव्य संपलं का गं आई
तुझ्या उबेची उणीव जाणवते गं आई
प्रश्नांचे चटके जाळुन टाकतील मला
जगवायला तरी येशील ना गं आई

शेवटची वेळ आली तरी
जवळ नाहीस आई
बाळाची परीक्षा किती घेणार आई
तळमळ तूझी सारी संपली का आई
इतकी निष्ठूर तू कधीच नव्हतीस गं आई

  • TAG