वटपौर्णिमा

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १२ जुलै २०१७

वटपौर्णिमा - मराठी कविता | Vatpournima - Marathi Kavita

ऐकीव काल्पनिक कि सत्य, माहित नाही ?
सावित्रीने आणले प्राण सत्यवानाचे
पुराणकाळातली कथा
अन्‌ आजच्या स्त्रीत्वाची परंपरागत व्यथा
यमाकडून नवर्‍याचे प्राण आणणारी सावित्री ग्रेट ?
कि तिच्या नावानं वडाला दोरे गुंडाळणारी मॉडर्न सावित्री ग्रेट ?
प्रश्नांचे कल्लोळ अन्‌ कल्लोळ प्रश्नांचे
भिरभिरत राहतात माझ्या बुद्धिवादी मेंदूत, भिनभिन करीत...
बाईपणाचे भोग, अस्मितेची जाण
वेदनेचा प्रचंड इतिहास अन्‌ अस्तित्वाचे भान
यातून तावून सुलाखुन इतिहासाला
दखल घ्यायला लावणारी सावित्री
स्त्री शिक्षणासाठी पहिलं पाऊल उचलणारी उद्गाती
रूढीवादी कि विज्ञानवादी यांच्या झटापटीत
सावित्री दाखविले मला मार्ग
सच्चा सत्य अन्‌ उद्‌बोधक
मग माझी मीच मला
नवुआने उलगडत जाते
गवसतात सिद्धांत
सापडते सत्य
अन्‌ गळून पडतात बेगडी जगण्याचे सणसमारंभ
निसर्गनियमानुसार माणसाचा मृतू अटळ
मग कोणी ऐरा गैरा करू शकेल का त्यात ढवळाढवळ ?
मी ही शांत होत जाते हळूहळू
कल्लोळ थांबतात प्रश्नांचे
मी ही सोडून देते वटपौर्णिमा
त्यात गुंडाळून गेलेली मी
घेते मोकळा श्वास
नवी उमेद
सावित्री रूजवण्यासाठी
अवतीभोवती
आयाबायांत
विज्ञानवादी मी ही
धडपडते कधीची कधीची

  • TAG