MarathiMati.com - Android App on Google Play Store

तुझं देणं...

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १६ सप्टेंबर २००८

तुझं देणं... - मराठी कविता | Tujha Dena - Marathi Kavita

शोडश वर्षीय पदन्यास
मऊशार पुळणीत उमटवीत
तुझ्या लाटांची गाज ऐकत
बेभान होताना,
तुझ्या लाटेनं जे जे दिलं
ते ते जपून ठेवलं
त्या देण्यानं कधी
जीवन सुसह्य झालं,
कधी नेत्रीच्या कडा ओलावल्या
किनाऱ्यासारख्या...
कधी आधार वाटला त्यांचा...!
कधी आकाशीचा चंद्रमा निरखीत,
रेतीशी चाळा करीत, तुला बघताना
तू दिलेली धीर गंभीरता, विचारांची खोली...
तर कधी मध्यान्हीच्या उन्हात,
पायाला चटके देत तुझ्या समोर असतानाचा
तुझा धीरगंभीर आवाज... आश्वासक स्वर...
तेही जपलं...
आयुष्याच्या संध्याकाळी,
तुझं तुला परत करताना,
किलकिलत्या नजरेला लांबवर दिसली
एक शोडशवर्षीय...
जे मी तुला देणार...
तेच तुझ्याकडून घेण्यासाठी
उभी असलेली...

MarathiMati.com - Android App on Google Play Store