तू तर उत्कट उल्का

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | ३ जुलै २०१५

तू तर उत्कट उल्का - मराठी कविता | Tu Tar Utkat Ulka - Marathi Kavita

तेजस्वी तार्‍यांचे जंगल, तू तर उत्कट उल्का
काजळ कोरीत जणू उतरे ती लखलखती रेखा
ओलांडूनी तार्‍यांचे अंगण, तप्त लोळ तो उरी
मस्तक फोडून शिखरावर जणू उतरे दिपशिखा ॥धॄ॥

भेट व्हावया जिवा-शिवाची क्रमिली तू अंतरे
भेटीमधूनी सरले अंतर, उरले दिव्य खरे
जटांमधूनी सुटूनी जणू, ललकारी भगीरथा
तेजस्वी तार्‍यांचे जंगल, तू तर उत्कट उल्का ॥१॥

जगणे-मरणे, मरणे-जगणे ही भाग्याची लेणी
जगण्यास्तव पण किती चुकविशी दैवाची देणी
पूर्णामधुनी पूर्ण वगळूनी, पूर्ण तू नायिका
तेजस्वी तार्‍यांचे जंगल, तू तर उत्कट उल्का ॥२॥