तू दिलेलं...

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | १७ सप्टेंबर २००८

तू दिलेलं... - मराठी कविता | Tu Dilela - Marathi Kavita

तू दिलेलं मागतोस
उपरेपणानं
तुझंच तुला देताना
आक्रसणारं माझं मन
ठसठसणारी उरी जखम
तुझ्या देण्याट विरघळून गेलीय
काय देऊ तुझंच तुला...?
तुझं देणं होतं,
काठ पदर नसणारं वस्त्र
मी ते पांघरलं
सहनशीलतेचा काठ शिवून
संयमाचा पदर पांघरून
आता वस्त्र फाटालय...
उरलेत काठ नि पदर
ज्यात अडकलेत तुझ्या देण्याचे
काही धागे...
जे वेगळे करताना,
पदर फाटेल, काठ उसवेल...
मला न संपवता
तुझं तुला काय देऊ
देताना तुझ्या हातानी
तू कोरलंस... विश्वासाचं काजळ
नेत्रांच्या कडा पुसता पुसता
काजळ उडून गेलं
नेत्रकडा जखमी झाल्या
सर्वस्व देण्याचं वचन देणारा तू अंधुक दिसू लागलास
तुझा मागणारा आवाज वाढतोय...
थोडा थांब...
तुझा आवाज मनापर्यंत पोचू देणार नाही
मी काठ पदर उराशी घेऊन जगेन
डोळे उघडे ठेवून...