शहर

लेखन: | प्रकाशन: संपादक मंडळ | २० एप्रिल २००५

शहर - मराठी कविता | Shahar - Marathi Kavita

पलिकडच्या जंगालातील
माझ्या माध्यावरून भिरभिरणारे चांदणे
येथे विसावते
अन्‌ अचानक हे शहर वसताना मी पाहतो.

(दूर राहिलेल्या जंगलतील झाडांची हलती पाने
मी खुडून घेतली होती मुठी म्हणून बरे!)

शहरांच्या धमन्यातील रक्ताचा मागोवा घेत
मी वाळू हरवलेल्या समुद्रात उतरतो

उन्हे सरपटत राहतात माझ्या खारट शरीरावरून
अन्‌ मी या ओहटलेल्या समुद्रावरुन ओहटत.

माझ्यापुढे आता काही पर्याय आहेत.
पुढे जावे तर सुसाट वारा आकाशाचे तुकडे
माझ्या पाठीवर देईल
मागे तर शहराला भरती यायची वेळ झाली आहे.

पर्याय म्हणून मी शहराकडे पाठ करून
समुद्रावर हलका हलका पसरत जातो.